शिरोळ / प्रतिनिधी
नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना प्रभाग क्रमांक 4 मध्ये ताराराणी आघाडीच्या सौ.शारदा सुनील माने यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस जोरदार प्रतिसाद मिळत आहे. प्रभागातील नागरिकांशी दररोज संवाद साधत, स्थानिक प्रश्नांवर थेट चर्चा करत आणि प्रलंबित कामांचा तपशील मांडत त्या मतदारांचा विश्वास जिंकत आहेत. नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन तत्काळ उपाययोजना करण्याचा त्यांचा निर्धार मतदारांना सकारात्मक वाटत असून त्याचा लाभ त्यांच्या प्रचाराला मिळताना दिसत आहे.प्रभागातील पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्थापन, रस्त्यांची डागडुजी, स्ट्रीटलाइटची देखभाल,स्वच्छता यांसारख्या अनेक मूलभूत प्रश्नांवर आजही काही कामे प्रलंबित असल्याचे स्पष्टपणे सांगत सौ.माने यांनी या सर्व समस्यांवर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन मतदारांना दिले आहे. सध्या निवडणूक प्रचाराच्या काळात त्या घराघरांत जाऊन नागरिकांची मते जाणून घेत आहेत. महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी, वयोवृद्धांसाठी सुविधा, तर युवकांसाठी क्रीडा साहित्य आणि प्रशिक्षण केंद्र यांसारख्या विविध विकासयोजनांची माहितीही त्या सभांमधून देत आहेत.प्रचारादरम्यान अनेक नागरिकांनी सौ. माने यांना पाठिंबा जाहीर करत,प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम नेतृत्वाची गरज आहे आणि ते नेतृत्व शारदाताई देऊ शकतात, असे मत व्यक्त केले. विशेषतः महिलांकडून सौ. माने यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून त्या स्थानिक प्रश्नांसोबतच सुरक्षितता, आरोग्य आणि शिक्षण या विषयांवरही मतदारांशी सखोल चर्चा करत आहेत.प्रभाग 4 मध्ये मतदारसंघातील वातावरण चांगलेच रंगत असून सौ. शारदा सुनील माने यांचा प्रचार वाढत्या वेगाने पुढे जात आहे.स्थानिकांचा वाढता विश्वास, त्यांच्यातील सहभाग आणि विकासाच्या दृष्टीने मिळणारा मोठा पाठिंबा पाहता आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक 4 मध्ये चुरशीची लढत होणार असून सौ.माने यांची उमेदवारी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.