शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ नगर परिषदेच्या येऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ताराराणी आघाडीकडून प्रभाग क्र. ७ मधून प्रशांत उर्फ संभाजी व्यंकटराव भोसले यांनी आपल्या उमेदवारी अर्जाची अधिकृत नोंद केली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या त्यांच्या समर्थकांच्या गर्दीमुळे नगरपरिषदेच्या निवडणुकीत उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले.संभाजी भोसले यांना स्थानिक स्तरावर विशेषतः तरुण मतदारांचा मोठा पाठिंबा लाभत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.प्रभागातील विकासकामे,तरुणांसाठी उपलब्ध संधी आणि स्थानिक प्रश्नांवर त्यांनी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न हे त्यांच्या लोकप्रियतेचे महत्त्वाचे कारण मानले जात आहे.अर्ज दाखल करताना त्यांनी प्रभागातील सर्व घटकांना समान महत्त्व देऊन सर्वसमावेशक विकास करण्याचा निर्धार व्यक्त केला.गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहामधून त्यांच्या भावजय सौ.कविता भोसले यांनी नेतृत्व करत कामगिरी बजावली होती.त्यांच्या कार्यकाळात प्रभागात शाश्वत विकासाची काही महत्वपूर्ण पावले उचलल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे प्रशांत भोसले यांच्याकडे प्रशासकीय कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव लाभल्याने प्रभाग क्रमांक सातमधून त्यांच्या उमेदवारीला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना संभाजी भोसले म्हणाले की, प्रभागातील नागरिकांचा विश्वास आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. विकासकामांना गती देणे,नागरिकांसमोरील दैनंदिन अडचणी दूर करणे आणि पारदर्शक प्रशासन देणे हे माझे प्राधान्य असेल.आगामी निवडणुकीत प्रभाग सातमध्ये रंगतदार लढत पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.विविध पक्षांच्या हालचालींना वेग आला असून मतदारांचे कौल कोणाच्या बाजूला झुकतो,हे पाहणे आगामी काळात उत्सुकतेचे ठरणार आहे.