शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळमध्ये आगामी निवडणुकीच्या प्रचारसत्रादरम्यान मतदारांच्या घरी जाऊन प्रचार व्हिडिओ करण्याच्या प्रथेबाबत समाजभूषण शहाजी अशोक गावडे देशमुख यांनी जनतेला सतर्क केले आहे.ते म्हणाले की, प्रचार करताना फक्त घराबाहेर जाऊन व्हिडिओ करणे योग्य ठरेल,कारण घरात प्रवेश करून त्या घरातील व्यवस्था, महिला पेशंट किंवा इतर खासगी माहिती सोशल मीडियावर शेअर केली जाते,जे नैतिकदृष्ट्या अयोग्य आहे.गावडे देशमुख यांनी म्हटले की,आम्ही नेहमीच सर्वसामान्य जनतेसाठी काम करतो हे दाखवण्याचा खटाटोप फक्त व्हिडिओसाठी होऊ नये.मतदारांचा स्वाभिमान कोणीही हिराऊन घेऊ नये. त्यामुळे समाजभान राखून आपले वर्तन ठेवणे आवश्यक आहे.निवडणुकीच्या प्रचारात प्रत्येक पक्षाला आपली भूमिका आहे, पण मतदारांच्या खासगी जागेत हस्तक्षेप न करता,घराबाहेर किंवा सार्वजनिक ठिकाणी प्रचार करणे अधिक योग्य राहील.या माध्यमातून प्रचार करताना मतदारांचा आदर राखणे गरजेचे आहे.शहरातील नागरिकांनी देखील या बाबतीत दक्ष राहावे आणि त्यांच्या कुटुंबाच्या खासगी जीवनाचा आदर करावा,असे त्यांनी आवाहन केले.प्रचाराचा उद्देश लोकांपर्यंत माहिती पोहोचवणे आहे,घरातील खासगी माहिती सोशल मीडियावर टाकणे नाही.शिरोळमधील निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होत असताना मतदारांनीही या सूचनांचे पालन करावे,ज्यामुळे सर्वांच्या स्वाभिमानाचा आदर राहील आणि शांततापूर्ण प्रचाराची संस्कृती टिकेल असे मत शहाजी गावडे यांनी शेवटी व्यक्त केले आहे.