बालेकिल्ला असणाऱ्या कुरुंदवाडमध्ये भाजप पक्षाला मोठा धक्का, माधवराव घाटगे यांच्या भूमिकेकडे पक्षाचे लक्ष 

Spread the love

प्रतिनिधी / शिरोळ

शिरोळ तालुक्यातील नगरपालिकांच्या निवडणुकांपूर्वी राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भाजप पुरस्कृत ताराराणी आघाडीने स्थानिक राजकारणात मोठी कलाटणी घडवून आणली आहे.गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव घाटगे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने नुकताच मेळावा घेऊन शिरोळ, जयसिंगपूर आणि कुरुंदवाड नगरपालिका निवडणुका भाजपच्या अधिकृत चिन्हावर लढविण्याची घोषणा केली.मात्र,पक्षातीलच काही ज्येष्ठ नेत्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवित स्थानिक आघाड्यांसोबत जाण्याची भूमिका घेतल्याने पक्षात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.कुरुंदवाड शहरातील परिस्थिती विशेषतः लक्षवेधी ठरत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या राजर्षी शाहू विकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कुरुंदवाडमध्ये पक्षाला मोठा धक्का बसला असून,अनेक कार्यकर्ते आता संभ्रमात आहेत. दरम्यान, शिरोळ शहरात जनसुराज्य पक्षाचे आमदार डॉ. अशोकराव माने यांनी भाजप पुरस्कृत ताराराणी आघाडीतून लढण्याची तयारी दर्शवली त्यामुळं या आघाडीला बळ मिळाले आहे.तर गत पंचवार्षिक निवडणुकीत जयसिंगपूरमध्ये ताराराणी आघाडीचा नगराध्यक्ष म्हणून निवडून आला असल्याने भाजप पक्ष,ताराराणी आघाडी, माधवराव घाटगे आणि अनिल उर्फ सावकर मादनाईक यांचा प्रभावी गट कार्यरत असून,या गटाचा झुकाव कुठे होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.जयसिंगपूर आणि कुरुंदवाड या दोन्ही शहरांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू विकास आघाडी व भाजप पुरस्कृत ताराराणी आघाडी यांच्यात थेट सामना होणार का? अशी चर्चा रंगली असून माधवराव घाटगे, अनिल उर्फ सावकर मादनाईक आणि राजवर्धन नाईक-निंबाळकर हे कोणत्या आघाडीबरोबर जातात यावर या दोन्ही शहरांच्या निवडणुकीचे राजकारण अवलंबून राहणार आहे. स्थानिक स्तरावर मतदारांच्या मनातील कल जाणून घेण्यासाठी दोन्ही आघाड्यांचे नेते दौरे, बैठकांद्वारे मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे आगामी नगरपालिकांच्या निवडणुकीत शिरोळ तालुक्याचे राजकारण रंगतदार होणार यात शंका नाही.

Leave a Comment

error: Content is protected !!