प्रतिनिधी : शिरोळ
शिरोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली असून सर्व राजकीय पक्ष आणि आघाड्यांमध्ये उमेदवारांच्या चाचपणीला वेग आला आहे.१० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत असली,तरी अद्याप कोणत्याही पक्षाने अधिकृत उमेदवारांची घोषणा केलेली नाही. प्रभागनिहाय इच्छुकांची वाढती गर्दी, आघाड्यांमधील अंतर्गत समीकरणे आणि गत निवडणुकीतील अनुभव लक्षात घेऊन नेतेमंडळी योग्य उमेदवार निवडीसाठी तारेवरची कसरत करत आहेत.
यादव आघाडीची हालचाल वेगवान
गत निवडणुकीत शाहू आघाडीबरोबर असलेले माजी खासदार राजू शेट्टी,दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील आणि माजी आमदार उल्हास पाटील हे एकत्र आले असून,युवा नेते पृथ्वीराज यादव यांच्या नेतृत्वाखाली ‘यादव आघाडी’ उभी राहत आहे. या आघाडीमुळे शिरोळ तालुक्यातील राजकीय चित्र अधिकच रंगतदार झाले आहे.यादव आघाडीने स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांशी चर्चा सुरू केली असून, काही प्रभागांमध्ये प्रचाराचे प्राथमिक नियोजन देखील सुरू केले आहे.
महायुतीत उमेदवार ठरवण्यात अडचणी
दरम्यान,जनसुराज्य पक्षाचे आमदार डॉ.अशोकराव माने,माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील आणि आमदार डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून उतरू पाहत आहेत.मात्र भाजपने आपली भूमिका स्पष्ट करत “कमळ” चिन्हावरच निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला आहे.दुसरीकडे, शिवसेना (शिंदे गट) चे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे आपल्या राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.यावरून भाजप आणि राजर्षी शाहू विकास आघाडीतील नेत्यांदरम्यान बैठका सुरू असल्या तरी अद्याप अंतिम तोडगा निघालेला नाही.प्रचारासाठी कमी वेळ उरला असून,आघाडीच्या घोषणेत होणाऱ्या विलंबामुळे इच्छुक उमेदवारांची धावपळ आणि घालमेल वाढली आहे.
गत निवडणुकीतील चित्र : चौरंगी लढत ठरली लक्षवेधी
२०१८ साली झालेल्या पहिल्याच नगरपरिषद निवडणुकीत शिरोळकरांनी चौरंगी लढत अनुभवली होती.काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजर्षी शाहू विकास आघाडीने सत्ता काबीज केली होती.या निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडीला ९, भाजपला ७ आणि एक अपक्ष उमेदवार विजयी झाला होता.अपक्ष म्हणून विजयी झालेले अरविंद माने हे भाजपचे बंडखोर उमेदवार होते.तर राजर्षी शाहू विकास आघाडीचे अमरसिंह पाटील हे शिरोळ नगरपरिषदेचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले.त्यावेळी जिल्ह्यातील ही निवडणूक लक्षवेधी ठरली होती, कारण नगरपरिषदेची पहिलीच निवडणूक असल्याने नगराध्यक्षपदाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
राजकीय दिग्गजांचा प्रचारात सहभाग
गत निवडणुकीत प्रचार मोहिमेला राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी आमदार सुरेश हाळवणकर,माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माजी मंत्री धनंजय मुंडे,आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, पाशा पटेल तसेच शिवसेनेचे लक्ष्मण वडले या नेत्यांच्या उपस्थितीमुळे निवडणुकीची रंगत वाढली होती. प्रचारसभांमध्ये दोन्ही प्रमुख आघाड्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत मतदारांचे लक्ष वेधून घेतले होते.
चार आघाड्यांची चुरस : सर्वांचे लक्ष शिरोळकडे
२०१८ मधील निवडणुकीत चार प्रमुख आघाड्या आमनेसामने आल्या होत्या
भाजप आघाडी : अनिल यादव आणि युवा नेते पृथ्वीराज यादव यांच्या नेतृत्वाखाली,
राजर्षी शाहू विकास आघाडी : माजी खासदार राजू शेट्टी, आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली,
बहुजन विकास आघाडी : माजी आमदार उल्हास पाटील आणि गोकुळचे माजी अध्यक्ष स्वर्गीय दिलीपदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली,
ताराराणी आघाडी : प्रमोद लडगे यांच्या नेतृत्वाखाली
या चौरंगी लढतीमुळे शिरोळ नगरपरिषदेची निवडणूक जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली होती. मतदारांच्या मनात स्थानिक प्रश्न,विकास कामे आणि नेतृत्वाची विश्वासार्हता या मुद्द्यांवर निर्णय झाला.
या वेळच्या निवडणुकीत काय वेगळे?
या वर्षीच्या नगरपरिषद निवडणुकीत समीकरणे पूर्णपणे बदललेली दिसतात.भाजपने स्वबळाची स्पष्ट भूमिका घेतली असली,तरी स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आणि आघाडीतील अन्य नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव जाणवतो.राजर्षी शाहू विकास आघाडीने आपल्या कार्यकर्त्यांना गाठीभेटी सुरू करण्याचे आदेश दिले असून, यादव आघाडी आणि बहुजन आघाडीमधील चर्चाही रंगात आहेत.राजकीय पातळीवर अनेक जुने कार्यकर्ते आपापल्या गटांशी निष्ठा राखत असले तरी,नव्या पिढीतील मतदारांकडे सर्वच पक्षांचे लक्ष आहे.शहरातील पायाभूत सुविधा, सांडपाणी प्रकल्प,कचरा,रस्त्यांची दुरवस्था, औद्योगिक विकास आणि भ्रष्टाचार यांसारख्या मुद्द्यांवर या वेळेस प्रचार केंद्रित राहणार असल्याचे राजकीय तज्ञांचे मत आहे.
नेत्यांची डोकेदुखी वाढली
नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी अनेक इच्छुक रांगेत असल्याने सर्वच आघाड्यांतील नेत्यांना उमेदवार निवडीचा पेच निर्माण झाला आहे.गत निवडणुकीत बंडखोरीचा फटका बसल्यामुळे यावेळी उमेदवार निवडताना अधिक दक्षता घेतली जात आहेत.याच पार्श्वभूमीवर आघाडीतील वरिष्ठ नेत्यांमध्ये अनेक गोपनीय बैठका सुरू असून,अंतिम यादी रविवारी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रचारासाठी कमी वेळ उपलब्ध असल्याने सर्वच पक्ष सोशल मीडियावर सक्रीय होण्यात व्यस्त आहेत.
राजकारणातील नव्या समीकरणांची चाचणी ठरणार
शिरोळ नगरपरिषदेची ही निवडणूक पुन्हा एकदा तालुक्याच्या राजकारणातील नव्या समीकरणांची चाचणी ठरणार आहे.भाजप-राजर्षी शाहू विकास आघाडीतील चर्चेचा निकाल,यादव आघाडीचे सावध पाऊल,तसेच महायुतीतील अंतर्गत तणाव या सर्व घटकांवरच या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.शिरोळकर मतदारांनी कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणाला नगराध्यक्षपदी बसवायचे,हे आगामी काही दिवसांत स्पष्ट होईल.