प्रतिनिधी / शिरोळ
नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच शिरोळ शहरातील राजकीय वातावरण एकदम तापले आहे.१० प्रभागांची आणि २० नगरसेवकांची ही शिरोळ नगरपालिका अस्तित्वात आल्यापासूनची ही दुसरी निवडणूक असली तरी यावेळी नगराध्यक्षपदासाठी अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गासाठी जाहीर झाल्याने या निवडणुकीला विशेष रंग देत आहे. पक्षीय राजकारणाबरोबरच गटातट,व्यक्तीगत प्रभाव आणि घराणेशाही या साऱ्यांची चुरस यावेळी पाहायला मिळणार आहे.या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात खरा सामना रंगणार असल्याचे चित्र सध्या स्पष्ट झाले आहे.या दोन्ही आघाड्यांतील स्थानिक नेते आणि कार्यकर्ते आगामी आठवड्यांत प्रचारात झोकून देण्यासाठी सज्ज झाले आहेत. नगराध्यक्षपदासाठी सौ.सारिका माने,सौ. योगिता कांबळे,सौ.श्वेता काळे,सौ.संगीता माने आतापर्यंत चार इच्छुक महिलांची नावे चर्चेत आहेत.या चौघींच्या उमेदवारीमुळे निवडणुकीचा रंग अधिक गडद झाला आहे.मात्र,अंतिम उमेदवारी कोणाची राहणार,कोण माघार घेणार आणि कोणाला आघाडीची अधिकृत साथ मिळणार हे पक्षीय व आघाडी प्रामुख्याच्या समन्वयानंतरच स्पष्ट होणार आहे.
सौ.सारिका माने : सामाजिक आणि राजकीय वारशाची परंपरा
हातकलंगलेचे आमदार दलितमित्र अशोकराव माने यांच्या स्नुषा असलेल्या सौ.सारिका माने या शिक्षिका असून समाजकार्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे.आमदार माने यांनी शिरोळ मागासवर्गीय सूतगिरणी,छत्रपती शाहू इंडस्ट्रियल इस्टेट आणि विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून मोठे सामाजिक जाळे उभे केले आहे.सारिका माने या त्या वारशावरच आपल्या राजकीय प्रवासाची दिशा ठरवत आहेत.त्यांच्या पती डॉ.अरविंद माने हे भाजप नेते आणि माजी नगरसेवक असल्याने त्यांना भाजप-शाहू विकास आघाडीचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या गटाची साथ मिळाल्यास त्यांची उमेदवारी अधिक बळकट होईल,असे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे.
सौ.योगिता कांबळे : यादव गटाची विश्वासू प्रतिनिधी
शिरोळ पंचायत समितीच्या माजी सदस्य असलेल्या सौ.योगिता कांबळे या राजकारणात गेली अनेक वर्षे यादव गटाशी एकनिष्ठ राहिल्या आहेत.यादव गटाचे नेते अनिल यादव आणि पृथ्वीराज यादव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पंचायत समिती सदस्य म्हणून उल्लेखनीय काम केले.शिरोळ नगरपालिका अस्तित्वात यावी यासाठी योगिता कांबळे यांनी आपल्या सदस्यपदाचा राजीनामा दिला होता,ही बाब मतदारांच्या आजही आठवणीत आहे.त्यांच्या प्रभागातील मतदारांमध्ये त्यांनी कामाच्या जोरावर विश्वास निर्माण केला असून,त्याच बळावर त्या नगराध्यक्षपदासाठी मैदानात उतरल्या आहेत.महाविकास आघाडीच्या गटातून त्यांना उमेदवारी मिळू शकते,अशी चर्चा आहे.
सौ. श्वेता काळे : ‘दादा काळे यांच्या ‘चाबूकफोड आंदोलना’चा वारसा
राजकारणात आणि सामाजिक चळवळीत एक वेगळी ओळख असलेल्या दादा काळे यांच्या सुविद्य पत्नी सौ.श्वेता काळे या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेचे जुने कार्यकर्ते असलेल्या दादा काळे यांनी एकेकाळी ऊस दरवाढीच्या आंदोलनावरून राज्य सरकारला जेरीस आणले होते.त्यांच्या नेतृत्वाखाली झालेले प्रसिद्ध चाबूकफोड आंदोलन आजही लोकांच्या आठवणीत आहे.याच सामाजिक कार्याचा वारसा घेत श्वेता काळे यांनी लोकसेवेच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी काम करण्याचा निर्धार केला आहे.शेतकरी आणि कामगार वर्गात त्यांना सहानुभूती मिळत असल्याचे दिसून येत आहे.
सौ. संगीता माने : कलाक्षेत्रातून समाजकारणाकडे वाटचाल
पत्रकार आणि अभिनेते दगडू माने यांच्या पत्नी सौ.संगीता माने यांनी “नावासाठी नाही तर गावासाठी”या टॅगलाईन खाली नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनयाच्या क्षेत्रात आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या संगीता माने या जनतेशी थेट संवाद साधण्यात कुशल आहेत.दगडू माने यांनी माध्यम आणि रंगभूमीच्या माध्यमातून सामाजिक विषय हाताळून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे.त्यामुळे पतीच्या कार्याचा फायदा संगीता माने यांना या निवडणुकीत होऊ शकतो.शिरोळमधील युवकवर्ग आणि सांस्कृतिक क्षेत्राशी जोडलेल्या मतदारांचा त्यांना पाठिंबा मिळेल,असे अंदाज वर्तवले जात आहेत.
शिरोळचा राजकीय वारसा आणि लौकिक
शिरोळ ही केवळ एक नगरपालिका नाही, तर ती कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय परंपरेचे प्रतीक आहे.माजी आमदार, दलितमित्र स्व.दिनकरराव यादव यांची ही जन्मभूमी आहे.त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले आणि शिरोळ विधानसभेचे प्रतिनिधित्व केले.त्याचप्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी जिल्हा परिषद, विधानसभा आणि दोनदा लोकसभेत प्रतिनिधित्व करत शिरोळचे नाव राज्याच्या पातळीवर पोहोचवले.माजी आमदार उल्हास पाटील यांनीही शिरोळ विधानसभेचे प्रतिनिधित्व करून राजकारणात ठसा उमटवला आहे.या सर्व मातब्बर नेत्यांमुळे शिरोळचे राजकीय महत्त्व सातत्याने वाढत गेले आहे.
पक्षीय समीकरणे आणि आगामी दिशा
सध्या शिरोळमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हींची जोरदार तयारी सुरू आहे. दोन्ही बाजूंकडून मतदारांशी संपर्क मोहीम, प्रचार आराखडा आणि अंतर्गत बैठका सुरू झाल्या आहेत. स्थानिक स्तरावर शिवसेना (शिंदे गट), भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचे वेगवेगळे समीकरण तयार होण्याची शक्यता आहे.नगराध्यक्षपदासाठी कोणाला अधिकृत उमेदवारी मिळणार, कोणाला स्थानिक पातळीवरील गटांचा पाठिंबा लाभणार आणि कोणत्या महिला उमेदवाराला जनता आपल्या मतांनी विजयी करते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
नगरपालिका निवडणूक : दुसरी परंतु निर्णायक
शिरोळ नगरपालिका अस्तित्वात आल्यापासूनची ही दुसरीच निवडणूक असली तरी यावेळी लोकांची उत्सुकता प्रचंड आहे.गत वर्षी ८ प्रभागातून १७ नगरसेवकांची होती यावेळी १० प्रभाग व संख्या २० असून प्रत्येक प्रभागातून दोन प्रतिनिधी निवडले जाणार आहेत.नागरिकांना विकास,पाणीपुरवठा, स्वच्छता,औद्योगिक प्रगती आणि शहर नियोजन या विषयांवर ठोस भूमिका अपेक्षित आहे.राजकीय घराणी, सामाजिक कार्य, गटबाजी आणि स्थानिक समीकरणांच्या संगमावर ही निवडणूक उभी आहे. त्यामुळे शिरोळच्या राजकारणात आगामी काही दिवसांत अनेक नवे फेरबदल घडतील, यात शंका नाही.