शिरढोण / प्रतिनिधी
शिरढोण माळ भाग परिसरात आज शुक्रवार, दिनांक १९ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता एक हृदयद्रावक घटना घडली.कोल्हापूरकडे प्रवास करत असताना वजीर रेस्क्यू फोर्सचे जवान हैदर अली मुजावर यांच्या लक्षात आले की,विजेच्या तारेवर एक वानराचे पिल्लू शॉक लागून लटकत आहे.अंदाजे दोन ते तीन तासांपासून ते पिल्लू तिथे अडकून होते, पण या काळात अनेक वाहने जात होती तरी कुणीही थांबले नाही. मात्र त्या पिल्लाची आई मात्र सैरावैरा धावत असल्याचे दृश्य पाहून अनेकांचे डोळे पाणावले.घटनेची माहिती मिळताच महावितरणचे एक वायरमन तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि विजेचा पुरवठा बंद केला. त्यानंतर हैदर अली मुजावर आणि त्यांच्या टीमने एक पाईपच्या साहाय्याने काळजीपूर्वक पिल्लाला खाली उतरवले. दुर्दैवाने, तोपर्यंत त्या पिल्लाचा मृत्यू झाला होता. त्यांनी मृत पिल्लास स्थानिक नागरिकांच्या स्वाधीन केले.या वेळी अनिल पिसे या संवेदनशील नागरिकाने पुढाकार घेत पिल्लाचे अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी धार्मिक विधी करून त्याचे अंत्यसंस्कार केले.या घटनेने प्राणीमात्रांप्रती आपुलकी आणि सहवेदना काय असते,याचा एक प्रत्यय समाजाला आला.वजीर रेस्क्यू फोर्स, महावितरणचे कर्मचारी,आणि स्थानिक नागरिकांचे या संयुक्त प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत आहे.या घटनेतून समाजानेही प्राण्यांप्रती सहवेदना बाळगण्याची गरज अधोरेखित झाली असून, अशा प्रसंगी सर्वांनी पुढे येणे ही काळाची गरज असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.