शिरोळ / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे पुरस्कार प्राप्त झालेल्या शिरोळ पोलीस ठाण्याचे तात्कालीन पोलीस निरीक्षक व सध्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.शिरोळ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना दत्तात्रय बोरिगिड्डे यांनी पोलीस ठाण्याच्या कामकाजात सुसूत्रता आणून लोकाभिमुख कार्य केले. रखडलेल्या गुन्ह्यांचा तपास केला.अनेक गुन्हे उघडकीस आणून आरोपींना अटक करून न्यायालयात खटले दाखल केले. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये कायदा सुव्यवस्था राखत शांतता प्रस्थापित करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. तसेच पोलीस ठाण्याच्या इमारतीचे सुशोभीकरण केले. शिरोळे पोलिसांच्या कामकाजाची दखल घेऊन राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे हा पुरस्कार शिरोळ पोलीस ठाण्यास देण्यात आला.या कामगिरीबद्दल मुंबई येथे शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी राज्यातील अनेक मंत्री महोदय, पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.