हातकणंगले / प्रतिनिधी
हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, भाजपा पंचायतराज आणि ग्रामविकास विभागाच्या कार्यकर्त्यांनी आम्ही निष्ठावंत आमचं काय अशी हाक देत पेठ वडगाव येथे मेळावा घेतला.यावेळी आम्हाला सत्तेत वाटा मिळाल्याशिवाय कोणाचाही प्रचार करणार नसल्याची भूमिका कार्यकर्त्यांनी जाहीर करत खदखद व्यक्त केली.हातकणंगले विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीच्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्ते आणि भाजपा पंचायत राज ग्रामविकास विभागच्या कार्यकर्त्यांनी पेठ वडगाव इथं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर मेळावा घेतला. लोकसभेची जागा शिवसेनेला, विधानसभेची जागा जनसुराजला मिळाली आहे.पण त्यानंतर येणाऱ्या अनेक निवडणुकीमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जाते. सत्तेत कोणताच वाटा मिळत नसल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी कमळ चिन्हावर उमेदवारी द्यावी अशी मागणी लावून धरली होती.पण ही जागा मित्र पक्षाला गेल्याने कार्यकर्त्यांच्या मध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली.त्यातच भर म्हणजे भाजपाच्या चिन्हावर जिल्हा परिषद काम केलेल्या अशोकराव माने यांनी विधानसभेला जनसुराजचा झेंडा घेतला.गेली पाच वर्षे त्यांच्या कार्यालयातून भाजपच्या बूथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख यांना घेऊन पक्षाचे काम केले.पण निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी जनसुराज्यची उमेदवारी स्वीकारली.त्याचबरोबर त्यांच्यासह त्यांच्या कार्यालयातून निष्ठावंत जुन्या भाजप कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याची खदखद या मेळाव्यात व्यक्त करण्यात आली.जोपर्यंत इथून पुढे होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीतील सत्तेचा वाटा मिळण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून शब्द मिळत नाही तोपर्यंत निवडणुकीच्या यंत्रणेत उतरायचे नाही. आणि त्यातूनही बेधखल केले तर पर्याय उपलब्ध आहेत. भाजपा पंचायत राज आणि ग्रामविकास विभागाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय पाटील यांनी पुढाकार घेऊन भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक रानमळे,तालुका अध्यक्ष सतीश पाटील, विधानसभा प्रमुख सयाजी पाटील,विजय शहा, सुधाकर पिसे यांनी मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष वाठारकर, भाजपा हातकणंगले तालुका उपाध्यक्ष धनंजय गोंदकर, वडगाव शहर अध्यक्ष जगन्नाथ माने,सुप्रिया पाटील,सुरेखा सूर्यवंशी,परशुराम चव्हाण, श्रीकांत ठिगळे,विकास कांबळे, युवराज वाळवेकर,हरी झगडे,दिगंबर पोळ, शशिकांत पिसे,राजु जाधव,राजेंद्र बुरुड, विशाल सनगर यांच्यासह हात करत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.