कोथळीच्या आदर्श विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात
कोथळी : प्रतिनिधी
39 वर्षांपूर्वी शिक्षण घेत असताना वर्गमित्रांच्या समवेतअसणाऱ्या ऋणानुबंधांच्या घटना डोळ्यासमोर येत असताना प्रत्येकाचं मन आनंदाने भरून येत असताना त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळताना दिसत होते या निमित्ताने प्रत्येकाच्या ऋणानुबंधाच्या गाठी दिसून येत होत्या निमित्त होते ते कोथळी येथील आदर्श विद्यालयातील सन 1984 – 85 सालातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्याचे
आदर्श विद्यालयातील सन 1984 -85 या वर्षातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी रविवारी गुरुजन, मित्र मैत्रिणी,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी मुख्याध्यापक ए डी शिरोटे हे या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी होते,
उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी आपले गुरुजन वर्गशिक्षक एस बी नेजकर ,एम बी चकोते, एन बी उपाध्ये, ए टी पाटील, टी एस माळी, डी बी भगाटे, एम बी चिंचवाडे, एन डी पाटील मॅडम ,ए बी पुदाले, ए एस बोरगांवे,जी एन पाटील व शिक्षकेतर कर्मचारी यांची पाद्यपूजा करून व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला.
जीवनात यशस्वी होण्यासाठी योग्य मार्गदर्शन करणाऱ्या गुरुजनांचा आदर ठेवून 39 वर्षानंतर त्यांचा यथोचित सन्मान करून गुरुवंदना देणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक या समारंभाचे अध्यक्ष ए डी शिरोटे यांनी केले तसेच त्यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावाही आपल्या मनोगतामध्ये घेतला.
शैक्षणिक क्षेत्रात सेवा करत असताना प्रत्येक विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल घडावे यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची जी पुण्याई आम्ही कमवली ती पुण्याई तुम्हा विद्यार्थ्यांच्या आशीर्वादामुळे परत आम्हा सर्वांचीच मुले सध्या चांगली शिकून ती आपापल्या संसारात सुखी असल्याने परत मिळाली आहे असे मनोगत एम बी चकोते यांनी व्यक्त केले.
उज्वला हाळे ,जयश्री उपाध्ये ,सुजाता शिरोटे ,सुनिता इंगळे, सुनीता कोरे व संजीव पुजारी या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतमधून गतकाळातील आठवणींना उजाळा दिला.या आदर्श दहावी 1984-85 बॅचने आदर्श विद्यालयात शिकणाऱ्या व वाड्या वस्त्यावरून चालत येणाऱ्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शाळेला येण्यास सोयीचे व्हावे म्हणून सायकल घेण्यासाठी देणगी ही दिली.
या स्नेह मेळाव्यात दीप प्रज्वलन, प्रार्थना ,श्रद्धांजली ,गुरुजनांचा,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार, माजी विद्यार्थ्यांचा परिचय , करमणुकीचे कार्यक्रम, गीत गायन ,फनी गेम्स, अल्पोहार ,भोजन यासह विविध कार्यक्रम आमाप उत्साहात पार पडले
स्वागत दिलीप माळी यांनी केले,सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन व्ही बी चौगुले यांनी केले.या बॅचचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपचार थांबवून स्नेह मेळाव्यास उपस्थिती
सन 1984-85 या दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे आवडते वर्गशिक्षक एस बी नेजकर हे या स्नेह मेळाव्याच्या ठिकाणी दिसत नव्हते त्यामुळे सर्व विद्यार्थी ची मने नाराज झाली जसे माहेरला गेल्यावर समोर आई नाही दिसली की होते. तसे नेजकर सर प्रकृती अस्वास्थामुळे उपचारासाठी रुग्णालयात चार दिवसापासून उपचारासाठी दाखल होते
मात्र 39 वर्षानंतर आपले सर्व विद्यार्थी आणि सवंगडी भेटणार असल्यामुळे त्यांनी उपचार थांबवून रुग्णालयातूनच कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन दिवसभर कार्यक्रमात उपस्थित राहून आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले.
कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा ते रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रती असणारा जिव्हाळा व ऋणानुबंध दिसून आला आणि याची माहिती विद्यार्थ्यांना कळताच विद्यार्थ्यांच्याही डोळ्यात आनंदाश्रू तरळले.