श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरुसानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
धार्मिक सोहळ्याबरोबर विविध स्पर्धा शर्यती कुस्त्यांचे जंगी मैदान सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन
शिरोळ / प्रतिनिधी
सर्वधर्म समभावाचे प्रतीक असणाऱ्या शिरोळचे ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूस सोमवार दिनांक ४ ते शुक्रवार दिनांक ८ डिसेंबर २०२३ या कालावधीत होणार आहे.
यानिमित्त धार्मिक सोहळ्याबरोबर विविध स्पर्धा शर्यती कुस्त्यांचे जंगी मैदान सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम असे भरगच्च कार्यक्रम होणार असल्याची माहिती श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूस संयोजन समितीचे आधारस्तंभ व युवानेते पृथ्वीराजसिंह यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते बोलताना पुढे म्हणाले की श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरुसाची तयारी पूर्ण झाली आहे सोमवारी या उत्सव व उरूसाची सुरुवात होणार आहे. यानिमित्ताने धार्मिक सोहळा व विविध कार्यक्रम होणार आहेत
सोमवार दिनांक ४ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी सव्वानऊ वाजता श्री बुवाफन महाराज यांच्या मंदिरात समाधीस महाअभिषेक व पूजा करण्यात येणार आहे.येथील विठ्ठल मंदिरात पुरुषी गटाची रांगोळी व श्रीराम मंदिरात महिला गटाची रांगोळी स्पर्धा,होणार आहे.
महसूल भवन येथे तालुका मर्यादित दुहेरी कॅरम स्पर्धा होणार आहे.जुन्या तहसीलदार कार्यालयाच्या पाठीमागील मैदानात डायरेक्ट व्हाँलीबॉल स्पर्धा आयोजित केली आहे.यानंतर पुष्पक चित्रमंदिरच्या पाठीमागील रस्त्यावर मोटरसायकलबरोबर रेडकू पळवणे , मोटरसायकलबरोबर म्हैस पळवणे ही स्पर्धा होणार आहे.
रात्री श्री बुवाफन महाराज मंदिरात मंदिराचे पुजारी हिरेमठ स्वामी वीरशैव लिंगायत समाज आणि प्रमुख व दिवटीचे मानकरी यांच्या उपस्थितीत गंधरात्र हा धार्मिक सोहळा होणार आहे.
येथील पद्माराचे विद्यालयाच्या मानधने क्रीडांगणावर झालेल्या स्पर्धेचा बक्षीस वितरण व सत्कार समारंभ आणि आर्केस्ट्रा विश्व अप्सरा हा करमणुकीचा कार्यक्रम होणार असून यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मंगळवार दिनांक ५ डिसेंबर रोजी मिठारगी कनवाड रस्ता येथे गावातील बिनदाती व दोन दाती बैलगाडी शर्यत गावातील घोडागाडी शर्यत गावातील दुबैली गाड्यांच्या शर्यती होणार आहेत.अर्जुनवाड रस्त्यावर महिला व पुरुष गटाची मॅरेथॉन स्पर्धा,हातगाडा स्पर्धा,महिला व पुरुष गटाची सायकल स्पर्धा होणार आहे.
मंगळवारी सायंकाळी पारंपारिक वाद्याच्या गजरात शाही मिरवणुकीने व शोभेच्या दारूच्या आतिषबाजीत श्री बुवाफन महाराज यांच्या समाधीस मानाचा गलिफ अर्पण करण्यात येणार आहे.
या धार्मिक सोहळ्यास सर्व मान्यवर पदाधिकारी भक्तगण उपस्थित राहणार आहेत. यानंतर झालेला स्पर्धेचा बक्षीस वितरण व सत्कार समारंभांनंतर लावण्य चंद्रा लावणी हा बहारदार लावण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
बुधवार ६ डिसेंबर रोजी सकाळी खुला बैल पळवणे,घोड्यावर बसून,गावातील कामाठी बैलगाडी शर्यती होणार आहेत.यानंतर श्री दत्त ग्राहक भांडारसमोरील रस्त्यावर खुल्या गटातील आणि इनलाईन स्केटिंग स्पर्धा आयोजित केली आहे.या स्पर्धेनंतर येथील दसरा चौकात गाडी मागून श्वान पळवणे ही स्पर्धा होणार आहे.
सायंकाळी चार वाजता श्री बुवाफन महाराज मंदिरासमोरील कै माजी आमदार दिनकररावजी यादव कुस्ती आखाडा येथे कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित केले आहे.आमशी घोरपडी कुस्ती केंद्राचा मल्ल पै संग्राम पाटील (सेनादल) विरुद्ध शिवराम दादा आखाडा पुणेचा मल्ल पै सुबोध पाटील (सैनिकटाकळी) यांच्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती होणार आहे.
दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती व्यंकोबा मैदान इचलकरंजीचा मल्ल आणि महाराष्ट्र चॅम्पियन पै श्रीमंत भोसले विरुद्ध हांडे पाटील तालीम सांगलीचा मल्ल पै सुदेश ठाकूर( मध्यप्रदेश) यांच्यात होणार आहे.तसेच या मैदानात लहान-मोठ्या अनेक कुस्त्या होणार आहेत यावेळी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महिला उपमहाराष्ट्र केसरी पै अमृता शशिकांत पुजारी यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे.रात्री हजरत नुरखान बादशाह दर्गाह येथे समस्त चर्मकार समाज मुजावर पुजारी देवर्षी कुरणे परिवार पारंपरिक मानकरी आणि भक्तगणांच्या उपस्थितीत गंधरात्र हा धार्मिक सोहळा होणार आहे.
रात्री झालेल्या स्पर्धेचा बक्षीस वितरण व समारंभ झाल्यानंतर मालती इनामदार लोकनाट्य तमाशा मंडळाचा करमुनिकीचा कार्यक्रम होणार आहे.
गुरुवार दिनांक ७ डिसेंबर रोजी सकाळी जनरल घोडागाडी शर्यत,अ गटातील जनरल दुबैली गाड्यांच्या विराट शर्यती, ब गटातील जनरल दुबैली गाड्यांच्या शर्यती होणार आहेत
तसेच समतानगर रस्त्यावर ट्रॅकवरील श्वान शर्यत आयोजित केली आहे.यानंतर श्री बुवाफन महाराज मंदिरासमोर सुदृढ बैल जोडी ,उत्कृष्ट देशी गाय,उत्कृष्ट देशी घोडा,उत्कृष्ट बिनदाती खोंड,उत्कृष्ट संकरित गाय,
उत्कृष्ट मुरा/ म्हैसाणा म्हैस,उत्कृष्ट पंढरपुरी म्हैस या स्पर्धा होणार आहेत.गुरुवारी सायंकाळी पारंपारिक वाद्याच्या गजरात शाही मिरवणुकीने व शोभेच्या दारूची अतिशबाजी करत हजरत नूरखान बादशाह यांच्या समाधीस मानाचा गलिफ अर्पण करण्यात येणार आहे.
यावेळी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत सायंकाळी लावणी महोत्सव हा करमणुकीचा कार्यक्रम आणि बक्षीस वितरण व सत्कार समारंभ होणार आहे.
शुक्रवार दिनांक ८ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी चौकातील भाजी मंडई येथे एकतारी भजनी स्पर्धा होणार आहेत.
सर्व स्पर्धेतील सर्व विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम कायम चषक व ढाल आणि शिल्ड पारितोषिक म्हणून दिले जाणार आहे.श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नुरखान बादशाह उरूसाची तयारी पूर्ण झाली आहे.
शर्यतीसाठी कनवाड रस्त्यावरील मिठारगी येथे मैदान तयार करण्यात आले आहे.रस्त्यावरील झाडे झुडपे काढण्यात आली आहेत.सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगी नंतर प्रथमच बैलगाडी शर्यत होत आहे यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती मंजुरी आणण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार या बैलगाडी शर्यती होणार आहेत सर्व बैलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.कुस्त्यांसाठी कुस्ती मैदान तयार करण्यात आले आहे.यावर्षी विविध प्रकारच्या सर्वाधिक स्पर्धा व शर्यती याचे आयोजन करण्यात आले आहे.
या उत्सव आणि उरूसासाठी लोकप्रतिनिधी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर आजी-माजी पदाधिकारी यांना आमंत्रित करण्यात आले आहे.हा सोहळा पार पाडण्यासाठी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना शिरोळ नगरपरिषद पोलीस ठाणे तहसीलदार कार्यालय यांच्यासह विविध सहकारी साखर कारखाने सूतगिरणी संस्था बँक यांचे सहकार्य लाभले आहे.
यावेळी पवनपुत्र तरुण मंडळाचे आधारस्तंभ व माजी ग्रामपंचायत सदस्य विजय आरगे श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरुस समितीचे अध्यक्ष बाळासाहेब जगदाळे उपाध्यक्ष संतोष विटेकरी,पदाधिकारी प्रदीप हेरवाडे,संतोष घाडगे,राहुल कोळी,
पिराजी जयान्नावर,किरण जगताप,लखन कुंभार,सागर कांबळे,संजय जगदाळे,संदीप कोळी,प्रताप जगदाळे,गणेश मोरे,कुमार जयान्नावर,नितीन कोळी यांच्यासह मान्यवर आणि सदस्य उपस्थित होते .