राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत वेदांत गावडेची यशस्वी भरारी! दत्त साखर व्यायामशाळेच्या खेळाडूची सांघिक द्वितीय क्रमांकावर मोहोर

Spread the love

राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत वेदांत गावडेची यशस्वी भरारी!दत्त साखर व्यायामशाळेच्या खेळाडूची सांघिक द्वितीय क्रमांकावर मोहोर; कोल्हापूर जिल्ह्याचे राज्यस्तरावर प्रतिनिधित्व

शिरोळ / प्रतिनिधी

जिद्द, मेहनत आणि जिद्दीला योग्य मार्गदर्शनाची जोड मिळाली की यशाचे शिखर गाठता येते, हे शिरोळच्या वेदांत अनिल गावडे याने सिद्ध करून दाखविले आहे. श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. दत्तनगर, शिरोळ अंतर्गत कै. दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळ ट्रस्टच्या व्यायामशाळेचा खेळाडू वेदांत याने १७ वर्षांखालील शालेय राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत सांघिक द्वितीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले. त्याच्या या यशामुळे शिरोळच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठाणे पूर्व येथील तालुका क्रीडा संकुल, कोपरी, बारा बंगला येथे ३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत वेदांतने आपल्या कौशल्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन करत सांघिक द्वितीय क्रमांकाच्या यशात मोलाचे योगदान दिले. विशेष म्हणजे, या स्पर्धेत राज्यस्तरावर कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारा तो एकमेव खेळाडू होता. त्यामुळे त्याच्या यशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

वेदांत हा श्री पद्माराजे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, शिरोळ येथे इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेत आहे. शिक्षणाबरोबरच मल्लखांब या पारंपरिक भारतीय खेळाचा सराव सातत्याने करत त्याने राज्यस्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्याला एनआयएस प्रशिक्षक सर्वोदय देबाजे यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल उद्यानपंडित गणपतराव पाटील, कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, कै. दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष संजीवकुमार देसाई, सचिव निलेश पाटील, सदस्य विलासराव माने तसेच प्रशिक्षक संजय देबाजे यांनी वेदांतचे अभिनंदन केले.

ग्रामीण भागातील खेळाडूंना योग्य व्यासपीठ, सुविधा आणि मार्गदर्शन मिळाल्यास ते राज्यस्तरावरही चमकदार कामगिरी करू शकतात, याचे वेदांतचे यश हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. त्याच्या या यशामुळे शिरोळच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून त्याच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!