संत गुरु रविदास विश्व महापीठाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी डॉ. अरविंद माने : वाराणसीतील काशी येथे आंतरराष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान
शिरोळ / प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील ऐतिहासिक आणि पवित्र तीर्थक्षेत्र वाराणसी (काशी) येथे शिरोळचे सुपुत्र तथा भाजपचे महाराष्ट्र प्रदेश राज्यसभा सदस्य डॉ. अरविंद माने यांची ‘शिरोमणी संत गुरु रविदास विश्व महापीठ’ या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीमुळे शिरोळच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या पवित्र जन्मस्थान मंदिर परिसरात या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली. सामाजिक समता, बंधुता, मानवता आणि आध्यात्मिक विचारांचा प्रसार करणाऱ्या संत गुरु रविदास महाराज यांच्या विचारांचा वारसा महाराष्ट्रात व्यापक करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी डॉ. माने यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे.
या निवडीचे अधिकृत नियुक्तीपत्र विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष तथा कुशल संघटक आलोक कुमार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी रविदास विश्व महापीठाचे आंतरराष्ट्रीय महामंत्री आत्माराम भाई परमार, राष्ट्रीय अध्यक्ष सुरजीत कुमार तसेच राष्ट्रीय महामंत्री नामदेव कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र स्वीकारताना डॉ. माने यांचा गौरव करण्यात आला.
संत गुरु रविदास महाराज यांनी आपल्या विचारांतून समाजातील विषमता, जातिभेद आणि उच्च-नीचतेच्या भावनेला विरोध करीत समतेचा संदेश दिला. ‘मन चंगा तो कठौती में गंगा’ या विचारातून त्यांनी अंतःकरणाची शुद्धता, मानवता आणि सामाजिक एकात्मतेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या विचारांचा प्रसार समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य रविदास विश्व महापीठाच्या माध्यमातून केले जाते.
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून डॉ. अरविंद माने यांच्याकडून संघटनेचे राज्यभर विस्तारकार्य, संत रविदास महाराजांच्या विचारांचा प्रचार-प्रसार, सामाजिक सलोखा आणि समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक उन्नतीसाठी विविध उपक्रमांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
शिरोळच्या भूमिपुत्राला काशीच्या पवित्र भूमीत आंतरराष्ट्रीय संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाचा बहुमान मिळाल्याने शिरोळसह कोल्हापूर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही निवड शिरोळच्या सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.