भ्रष्टाचाराविरोधात कोल्हापूर जिल्ह्यात जनजागृतीचा जागर! : १२ तालुक्यांत दक्षता सप्ताहाचे आयोजन; महाविद्यालये, शासकीय कार्यालये, महिला बचत गटांपर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा थेट संवाद
कोल्हापूर | प्रतिनिधी
भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आणि शासकीय कामकाजात पारदर्शकता निर्माण करण्यासाठी कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हाभरात व्यापक जनजागृती मोहीम राबविली. केंद्रीय सतर्कता आयोग, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित दक्षता जनजागृती सप्ताहांतर्गत जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यांमध्ये नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. ‘समृद्धीसाठी सत्यनिष्ठा’ (Probity for Prosperity) ही संकल्पना घेऊन राबविण्यात आलेल्या या मोहिमेत भ्रष्टाचाराविरोधात तक्रार करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात आले.
दक्षता जनजागृती सप्ताहाचा प्रारंभ २६ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरातील ताराराणी सभागृहात झाला. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्या उपस्थितीत शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ देण्यात आली. यावेळी राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनी सप्ताहानिमित्त दिलेल्या संदेशाचे वाचन करण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी प्रास्ताविक केले. महसूल, पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
सप्ताहाच्या निमित्ताने केवळ शासकीय कार्यालयांपुरती जनजागृती मर्यादित न ठेवता ग्रामीण भागापासून औद्योगिक क्षेत्रापर्यंत मोहीम पोहोचविण्यात आली. जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था, कामगार संघटना, वाहनचालक-मालक संघटना तसेच एमआयडीसी परिसरातील उद्योजकांशी संवाद साधण्यात आला. शासकीय योजनांचा लाभ घेताना कोणत्या अडचणी येतात, लाचेची मागणी होते का, याबाबत माहिती घेऊन तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया समजावून सांगण्यात आली.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये भ्रष्टाचारविरोधी जागरूकता निर्माण करण्यासाठी सायबर कॉलेज, कमला महाविद्यालय, मौनी विद्यापीठ गारगोटी, राजर्षी शाहू कॉलेज रुकडी, केआयटी कॉलेज, शिवाजी विद्यापीठांतर्गत डीओटी कॉलेज, विठ्ठल पाटील कॉलेज कळे यांसह जिल्ह्यातील अकरा शैक्षणिक संस्थांमध्ये विशेष मार्गदर्शनपर बैठका घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या संपर्क क्रमांकांची माहिती देऊन पत्रकांचे वाटप करण्यात आले.
महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांमध्येही भ्रष्टाचारविरोधी जागृती करण्यात आली. शासकीय कामांसाठी लाचेची मागणी झाल्यास घाबरून न जाता तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले. आकाशवाणी कोल्हापूर, एफएम रेडिओ, स्थानिक वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे, केबल नेटवर्क, व्हॉट्सॲप आणि यूट्यूबच्या माध्यमातूनही जनजागृती करण्यात आली. शासकीय कार्यालयांमध्ये घोषवाक्यांचे बॅनर व स्टिकर्स लावण्यात आले.
या मोहिमेत नागरिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा टोल फ्री क्रमांक १०६४, मोबाईल क्रमांक ९४०४३२१०६४ तसेच अधिकृत संकेतस्थळ आणि मोबाईल ॲपची माहिती देण्यात आली.
पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस निरीक्षक उज्वला भडकमकर आणि त्यांच्या पथकांनी हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
लाच मागितल्यास तक्रार करा!
शासकीय काम करून देण्यासाठी कोणताही लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी भीती न बाळगता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. भ्रष्टाचाराला प्रोत्साहन न देता त्याविरोधात आवाज उठविणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून, सत्यनिष्ठ आणि पारदर्शक प्रशासनासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.