दत्त साखरच्या व्यायामशाळेचा क्रीडा क्षेत्रात डंका! वेदांत गावडे, सर्वोदय देबाजे आणि सृष्टी माने यांची राज्य व राष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड

Spread the love

दत्त साखरच्या व्यायामशाळेचा क्रीडा क्षेत्रात डंका! वेदांत गावडे, सर्वोदय देबाजे आणि सृष्टी माने यांची राज्य व राष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड

शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कै. दत्ताजीराव कदम व्यायामशाळेतील तीन गुणवान खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी निवड होण्याचा मान मिळवला आहे. वेदांत अनिल गावडे, सर्वोदय संजय देबाजे आणि सृष्टी भानुदास माने या खेळाडूंनी आपल्या कौशल्याच्या जोरावर मिळवलेल्या यशामुळे दत्त साखरच्या क्रीडा परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. त्यांच्या या यशाचे क्रीडाप्रेमी, प्रशिक्षक आणि परिसरातून कौतुक होत आहे.
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., दत्तनगर, शिरोळ अंतर्गत कार्यरत कै. दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळ ट्रस्टच्या व्यायामशाळेत खेळाडूंना विविध क्रीडाप्रकारांचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाच्या बळावर खेळाडू विविध स्तरांवर उल्लेखनीय कामगिरी करत असून, तिघांची राज्य व राष्ट्रीय स्पर्धांसाठी झालेली निवड ही व्यायामशाळेच्या गुणवत्तापूर्ण क्रीडा प्रशिक्षणाची पावती मानली जात आहे.
शालेय राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेसाठी वेदांत अनिल गावडे याची निवड झाली आहे. मल्लखांब या पारंपरिक भारतीय खेळात राज्यस्तरावर कौशल्य दाखवण्याची संधी त्याला मिळणार आहे.
सर्वोदय संजय देबाजे याची मुंबई विद्यापीठांतर्गत कुस्ती व ज्युदो या खेळांच्या विविध ठिकाणी होणाऱ्या अखिल भारतीय (ऑल इंडिया) राष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड झाली आहे. त्याच्या या निवडीमुळे दत्त साखरच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी भर पडली आहे.
दरम्यान, शिवाजी विद्यापीठांतर्गत झालेल्या रोप मल्लखांब स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर सृष्टी भानुदास माने हिची जयसिंगपूर कॉलेजमधून अखिल भारतीय राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या यशामुळे मुलीही मल्लखांबासारख्या कौशल्यपूर्ण खेळात राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करू शकतात, हे अधोरेखित झाले आहे.
या तिन्ही यशस्वी खेळाडूंचा दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव पाटील, कारखान्याचे चेअरमन रघुनाथराव पाटील, संचालक शेखर पाटील, नितीन बागे, ज्योतीकुमार पाटील, शरदचंद्र पाठक व अन्य पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या खेळाडूंना उद्यान पंडित गणपतराव पाटील, मंडळाचे अध्यक्ष संजीवकुमार देसाई, सचिव निलेश पाटील, सदस्य विलासराव माने आणि प्रशिक्षक संजय देबाजे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. या यशामुळे दत्त साखरच्या क्रीडा क्षेत्रातील वाटचालीला नवे बळ मिळाले असून, आगामी स्पर्धांमध्येही हे खेळाडू उल्लेखनीय कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!