माजी आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मोबाईलच्या टॉर्चवर अंत्यसंस्कार! उमळवाडच्या स्मशानभूमीची दयनीय अवस्था; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ संतप्त

Spread the love

आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मोबाईलच्या टॉर्चवर अंत्यसंस्कार!

उमळवाडच्या स्मशानभूमीची दयनीय अवस्था; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ संतप्त

उमळवाड | प्रतिनिधी

राज्याचे माजी आरोग्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या मतदारसंघातील उमळवाड गावात स्मशानभूमीच्या दयनीय अवस्थेमुळे ग्रामस्थांना मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी चक्क मोबाईलच्या टॉर्चचा आधार घ्यावा लागल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.गावात विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मारल्या जात असताना, मृत व्यक्तीला अखेरचा निरोप देण्यासाठी साध्या प्रकाशाचीही व्यवस्था नसल्याने प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

उमळवाड येथील सार्वजनिक स्मशानभूमीची गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्ती झालेली नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. स्मशानभूमीत पावसापासून संरक्षणासाठी पुरेसे शेड नाही, अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना बसण्याची व्यवस्था नाही आणि रात्रीच्या वेळी प्रकाशासाठी कायमस्वरूपी दिवेही नाहीत. त्यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास अंत्यसंस्कार कसे करायचे, असा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.

या मूलभूत सुविधांकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी वारंवार ग्रामसभेत आवाज उठविल्याचे सांगण्यात येते. मात्र, ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासनाकडून याकडे गांभीर्याने लक्ष दिले गेले नसल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. अखेर रविवारी घडलेल्या घटनेने प्रशासनाच्या उदासीनतेचे विदारक चित्र समोर आणले.

गावातील एका वयोवृद्ध महिलेचे रविवारी निधन झाले. सायंकाळच्या सुमारास अंत्यविधीसाठी त्यांचा मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात आला. मात्र, तेथे प्रकाशाची कोणतीही व्यवस्था नसल्याने सर्वत्र अंधार पसरला होता. अशा परिस्थितीत नातेवाईक आणि ग्रामस्थांना मोबाईलच्या टॉर्चचा उजेड करून अंत्यसंस्कार पार पाडावे लागले. आयुष्याच्या अखेरच्या प्रवासातही सन्मानाने निरोप देण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचा अभाव पाहून उपस्थित नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

‘विकासाच्या गप्पा भरपूर; स्मशानभूमीत मात्र अंधार!’अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून उमटत आहे. गावात विविध विकासकामांवर खर्च होत असल्याचे सांगितले जात असताना, प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यातील अंतिम संस्काराशी संबंधित असलेल्या स्मशानभूमीची ही अवस्था का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत उमळवाड सरपंच उपसरपंच यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

तातडीने सुविधा द्या, अन्यथा आंदोलन!

उमळवाडच्या स्मशानभूमीत तातडीने शेड उभारावे, पाण्याची व्यवस्था करावी आणि कायमस्वरूपी प्रकाशयोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने या प्रश्नाकडे त्वरित लक्ष देऊन कामे मार्गी न लावल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही समस्त ग्रामस्थांनी दिला आहे. आता ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासन या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन किती तत्परतेने कार्यवाही करते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!