शिरोली पुलाची माळवाडीत दिवसाढवळ्या घरफोडी साडेतीन तोळे सोने व २० हजार रोख लांबवली
पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील माळवाडी परिसरात बंद घरात भरदिवसा घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी साडेतीन तोळे सोने आणि २० हजार रुपयांची रोख रक्कम लांबवली. ही घटना घडून चार दिवस लोटले तरी अद्याप शिरोली पोलीस ठाण्यात अधिकृत गुन्हा नोंद झालेला नाही. अपुरे कर्मचारी आणि बंदोबस्ताचे कारण पुढे करून पोलीस हात झटकत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. ऐन दसऱ्याच्या सणासुदीच्या काळात घडलेल्या या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
शिरोली माळवाडी परिसरात विष्णू देशमुख हे आपल्या कुटुंबासह राहतात. ते व्यवसायाने ट्रॅक्टर चालक आहेत. शनिवारी सकाळी विष्णू देशमुख व त्यांचे कुटुंबीय नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या छतावर जाऊन जिन्याच्या दरवाज्यातून आत प्रवेश केला. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी पत्र्याच्या ट्रंक व कपाटातील साहित्य विस्कटून ३.५ तोळे सोने आणि २० हजार रुपये रोख रक्कम लांबवली. देशमुख हे सायंकाळी कामावरून घरी परतल्यानंतर घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे आणि कपाट उघडे असल्याचे देशमुख यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ ११२ क्रमांकावर संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच शिरोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मात्र, पक्की फिर्याद नोंदवून घेण्याऐवजी पोलिसांनी कच्ची फिर्याद लिहून घेतली आणि मुख्यमंत्री व दसऱ्याच्या सणामुळे पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी बाहेर आहेत, ते आल्यावर तुमची तक्रार घेऊ आणि दोन दिवसांनी बोलावून तपास करू असे सांगून त्यांना परत पाठवले. घटना घडून चार दिवस झाले तरी अद्याप याप्रकरणी गुन्हा नोंद झालेला नाही. दरम्यान, यासंदर्भासाठी शिरोली पोलिसांशी संपर्क साधला असता, त्यांनी दोन दिवसांत चोरीचा छडा लावून आरोपींना ताब्यात घेऊ, असे आश्वासन दिले आहे.
दसरा आणि दिवाळीसारखे सण सर्वसामान्य नागरिकांपासून सधन लोकांपर्यंत सर्वजण उत्साहात साजरे करतात. यासाठी अनेकजण घरात सोन्या चांदीच्या वस्तू आणि रोकड जवळ बाळगतात. अशा परिस्थितीत दिवसाढवळ्या घडलेल्या या घरफोडीमुळे ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. पोलिसांनी या घटनेचा तातडीने तपास करावा आणि परिसरात दिवसा व रात्रीची गस्त तातडीने वाढवावी, अशी संतप्त मागणी नागरिकांमधून होत आहे.