कोल्हापूरचा शाही दसरा ऐतिहासिक थाटात संपन्न ; शाही मिरवणुकीतून कोल्हापूरच्या लोकसंस्कृतीचे दर्शन, सोने लुटण्यासाठी करवीरवासीयांची अभूतपूर्व गर्द
कोल्हापूर / प्रतिनिधी
विजयादशमीच्या निमित्ताने कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकात आज मावळत्या सूर्याच्या साक्षीने शाही दसरा उत्सव मोठ्या उत्साहात आणि राजेशाही थाटात संपन्न झाला.कर्नाटक राज्यातील म्हैसूर नंतरचा देशातील सर्वात मोठा आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेला हा दसरा उत्सव कोल्हापूरवासीयांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा सुवर्ण क्षण ठरला. सोने लुटण्याच्या या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या करवीरवासीयांनी अभूतपूर्व उत्साह दाखवला. “सोनं घ्या… सोन्यासारखं रहा” अशा शुभेच्छांसह आपट्याची पाने एकमेकांना देत हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला.
राजेशाही थाट आणि सांस्कृतिक परंपरेचा संगम
कोल्हापूरच्या शाही दसरा उत्सवाला प्रमुख राज्य उत्सवाचा दर्जा प्राप्त झाला असून, गेल्या नऊ,दहा दिवसांपासून जिल्हा प्रशासनाकडून आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि उपक्रम कोल्हापूर शहरात उत्साहाच्या वातावरण पार पडले. विजयादशमी निमित्ताने दसरा चौकात शमी पूजनाचा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने व शाही थाटात पार पडला. करवीर निवासिनी अंबाबाई आणि तुळजाभवानीच्या पालख्यांसह भालदार, चोपदार, घोडेस्वार आणि शाही लवाजम्यासह झालेली मिरवणूक कोल्हापूरच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणारी ठरली. या मिरवणुकीदरम्यान मार्गावर दोन्ही बाजूंनी पुष्पवृष्टी करत नागरिकांनी उत्साहाने आपला सहभाग नोंदविला.
राजघराण्याची उपस्थिती आणि शाही सलामी
सायंकाळी सहाच्या सुमारास न्यू पॅलेस येथून गाड्यांच्या ताफ्यासह मेबॅक मोटारीतून खासदार शाहू महाराज, माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार युवराज मालोजीराजे, शहाजीराजे आणि यशराजे यांचे दसरा चौकात आगमन झाले. उपस्थित करवीरवासीयांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले.भालदारांनी ललकारी देत सलामी दिली तर पोलिस बँडच्या तालावर करवीर संस्थानचे मानगीत गायले गेले. त्यानंतर सरदार आणि मानकऱ्यांचे मुजरे घेत खासदार शाहू महाराजांसह राजघराण्यातील इतर सदस्य स्थानापन्न झाले.
शमी पूजन आणि सोने लुटण्याचा उत्साह
दसरा महोत्सव समितीच्यावतीने राजघराण्यातील सदस्यांचे स्वागत झाल्यानंतर राजपुरोहितांच्या पौरोहित्याखाली शमी पूजनाचा विधी पार पडला. यानंतर बंदुकीच्या फैरी झाडून अंबाबाईला सलामी देण्यात आली.सोने लुटण्याचा कार्यक्रम हा या सोहळ्याचा कळस ठरला.यावेळी करवीरवासीयांची अक्षरशः झुंबड उडाली.लुटलेले सोने घेऊन राजघराण्यातील सदस्यांना देण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. “सोनं घ्या… सोन्यासारखं रहा” अशा शुभेच्छा देत हा उत्सव मोठ्या श्रध्देने व उत्साहात साजरा झाला .
या शाही सोहळ्याला खासदार धनंजय महाडीक,आमदार सतेज पाटील,महापौर रूपाराणी निकम,कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक रंजनकुमार शर्मा, कुलगुरु राजनीश कामत, जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भारूड,पोलीस अधीक्षक निलोत्पल,अपर जिल्हाधिकारी अजय पवार ,प्र.कुलगुरु प्रा.डॉ ज्योती जाधव,वैद्यकीय अधिष्ठता डॉ.सदानंद भिसे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सरिता थोरात यांच्यासह कला,क्रीडा,उद्योग, नाटय,शिक्षण,प्रशासन क्षेत्रातील मान्यवर तसेच सरदार,इनामदार घराण्यातील प्रमुख मानकरी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
लोकसंस्कृतीचे दर्शन
भवानी मंडप ते दसरा चौक या मार्गावरील राजेशाही मिरवणुकीत देवीच्या पालख्यांसह कोल्हापूरच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडले. या मिरवणुकीने करवीरवासीयांचे मन जिंकले. दसरा उत्सवाच्या या शाही सोहळ्याने कोल्हापूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाची पुन्हा एकदा आठवण करून दिली. मावळ्यांच्या वेशभूषेतील घोडेस्वार, धनगरी ढोल, महिलांचे लेझीम, रणमर्द मावळ्यांचे पथक, इतिहासाच्या स्मृती जागवणारे पोवाडे, पारंपरिक पद्धतीने निघालेल्या देवीच्या पालख्या अशा शाही लवाजम्यात निघालेल्या मिरवणुकीने उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा एनसीसी व स्काऊट गाईडच्या विद्यार्थिनी उभ्या होत्या. या मिरवणूकीचे नियोजन जिल्हा व पोलीस प्रशासनाने अतिशय चांगल्या पद्धतीने केले होते.