ऐतिहासिक दसऱ्याला वाहतूक कोंडीचे गालबोट! शिरोळ पोलिसांचे नियोजन कोलमडले; नागरिकांचा मनस्ताप

Spread the love

ऐतिहासिक दसऱ्याला वाहतूक कोंडीचे गालबोट! शिरोळ पोलिसांचे नियोजन कोलमडले; नागरिकांचा मनस्ताप

सिमोउल्लंघनाच्या सोहळ्यासाठी प्रमुख मार्गांवर नियोजनाचा अभाव; वाहनधारकांसह प्रवाशांचे हाल, पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

शिरोळ | प्रतिनिधी

शिरोळ शहराची ऐतिहासिक परंपरा असलेल्या दसरा उत्सवाला आणि नवरात्रोत्सवाच्या सांगतेला यंदा वाहतूक कोंडीचे गालबोट लागले. ऐतिहासिक सिमोल्लंघनाच्या सोहळ्यासाठी शहरात नागरिकांची मोठी गर्दी उसळलेली असताना प्रमुख मार्गांवरील वाहतुकीचे नियोजन कोलमडल्याने वाहनधारकांसह प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक मुसा सुतार यांच्या नेतृत्वाखाली वाहतुकीचे प्रभावी नियोजन होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात निर्माण झालेल्या कोंडीमुळे पोलीस प्रशासनाच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

शिरोळ शहरातील ऐतिहासिक दसरा उत्सवाला ६४ वर्षांची मोठी परंपरा आहे. या उत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी हजारो नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतात.त्यातच नवरात्रोत्सवाची सांगता होत असल्याने विविध दुर्गामाता मंडळांच्या मिरवणुकाही शहरातून काढण्यात येत होत्या.त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर नागरिकांची आणि वाहनांची मोठी गर्दी झाली होती. अशा परिस्थितीत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी मार्ग, वाहतूक वळविण्याची व्यवस्था, महत्त्वाच्या चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त आणि गर्दीच्या ठिकाणी वाहतूक नियंत्रण यांचे नियोजन करणे आवश्यक होते.

मात्र, प्रत्यक्षात वाहतुकीची कोंडी निर्माण झाल्याने अनेक वाहनधारकांना मार्ग काढताना अडचणींचा सामना करावा लागला. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही वाहतूक सुरळीत होण्याची प्रतीक्षा करावी लागली.ऐतिहासिक सोहळ्यासाठी आलेल्या नागरिकांची गर्दी आणि मिरवणुकांमुळे वाढलेली वर्दळ लक्षात घेऊन पोलिसांनी आधीच उपाययोजना करणे गरजेचे होते. मात्र, योग्य नियोजनाचा अभाव जाणवल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती.

मोठा सोहळा, पण वाहतूक नियोजन कुठे?

शहरात ऐतिहासिक सीमो उल्लंघनाचा सोहळा होत असताना प्रमुख मार्गांवर वाहतुकीचा ताण वाढणार, हे स्पष्ट होते. असे असतानाही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुरेशी खबरदारी घेतली गेली होती का, असा सवाल उपस्थित होत आहे. उत्सवाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबरोबरच नागरिकांची गैरसोय टाळणे हीदेखील पोलिसांची महत्त्वाची जबाबदारी आहे. मात्र, वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनधारकांना आणि प्रवाशांना झालेल्या त्रासामुळे या जबाबदारीच्या अंमलबजावणीवर टीका होत आहे.

कायद्याची भाषा बोलणाऱ्या पोलिसांकडून नियोजनाची अपेक्षा

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणारे पोलीस अधिकारी गर्दीच्या महत्त्वाच्या दिवशी वाहतूक व्यवस्थेचे प्रभावी नियोजन करण्यात कमी पडल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत होती. उत्सवाच्या काळात नागरिकांना सुरक्षितपणे आणि विनाअडथळा प्रवास करता यावा, यासाठी पोलिसांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून वाहतूक नियंत्रित करणे अपेक्षित होते.

ऐतिहासिक दसरा उत्सव हा शिरोळच्या सांस्कृतिक वैभवाचा आणि परंपरेचा मानबिंदू आहे. अशा उत्सवाचे नियोजन करताना वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य देणे गरजेचे आहे. मात्र, वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना झालेल्या त्रासाने उत्सवाच्या व्यवस्थापनातील त्रुटी अधोरेखित झाल्या. भविष्यात अशा मोठ्या उत्सवांच्या वेळी वाहतुकीचे काटेकोर नियोजन करून नागरिकांची गैरसोय टाळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

उत्सवासाठी गर्दी होणार हे माहीत असताना वाहतूक नियोजनात त्रुटी का? राहिल्या असा संतप्त सवाल प्रवाशी व शहरातील नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!