तांत्रिक निकषांच्या कचाट्यात हातकणंगले तालुका; दुष्काळाच्या मदतीपासून शेतकरी वंचित!
विशेष बाब म्हणून संपूर्ण हातकणंगले तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; आमदार डॉ. अशोकराव माने यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
‘ट्रिगर-३’मध्ये समावेश करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
हातकणंगले / प्रतिनिधी
खरीप हंगाम २०२६ मध्ये पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे सोयाबीन, भुईमूग आणि भात या प्रमुख पिकांचे मोठे नुकसान झाले असतानाही, दुष्काळ व्यवस्थापन संहितेतील तांत्रिक निकषांमुळे हातकणंगले तालुका दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून वगळला गेला आहे. परिणामी, प्रत्यक्ष शेतात नुकसान सोसणाऱ्या शेतकऱ्यांना दुष्काळी मदतीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर, तांत्रिक निकषांपेक्षा प्रत्यक्ष नुकसानीचा विचार करून हातकणंगले तालुका विशेष बाब म्हणून संपूर्णतः दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. अशोकराव माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, लवकरच ‘ट्रिगर-३’मध्ये हातकणंगले तालुक्याचा समावेश करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे माने यांनी सांगितले.
सात दिवसांचा खंड, एका दिवसाचा पाऊस अन् पुन्हा १६ दिवस कोरडे
राज्य शासनाने २५ सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयांनुसार राज्यातील ३०५ तालुक्यांमध्ये ट्रिगर-१ आणि ट्रिगर-२ च्या निकषांनुसार दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र, हातकणंगले तालुक्याचा या यादीत समावेश झालेला नाही. दुष्काळ जाहीर करण्यासाठी सलग २१ दिवस पावसाचा खंड पडण्याचा निकष महत्त्वाचा ठरला आहे.
आमदार डॉ. माने यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलेल्या माहितीनुसार, हातकणंगले तालुक्यात २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत सलग सात दिवस पावसाने दडी मारली. त्यानंतर ३ सप्टेंबर रोजी केवळ ७.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुन्हा ४ ते २० सप्टेंबर या काळात सलग १६ दिवस पाऊस झाला नाही. अशा प्रकारे २४ दिवसांच्या संवेदनशील कालावधीत केवळ एका दिवसाच्या अत्यल्प पावसामुळे सलग २१ दिवसांच्या पावसाच्या खंडाची तांत्रिक अट पूर्ण झाली नाही. परिणामी, तालुका दुष्काळाच्या निकषांबाहेर राहिल्याचे माने यांनी स्पष्ट केले.
मात्र, २४ दिवसांच्या कालावधीत झालेला अवघा ७.२ मिलिमीटर पाऊस पिकांच्या गरजा भागविण्यासाठी पुरेसा नव्हता. त्यामुळे केवळ पावसाच्या नोंदीवर आधारित तांत्रिक निकषांमुळे प्रत्यक्षातील दुष्काळसदृश परिस्थिती दुर्लक्षित होत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे.
४० ते ५० टक्के शेती क्षेत्र बाधित
हातकणंगले तालुक्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या ८९.१२ टक्के पाऊस झाल्याची नोंद कागदोपत्री दिसत असली, तरी पावसातील दीर्घ खंडांमुळे खरीप पिकांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. सोयाबीन, भुईमूग आणि भात या पिकांच्या फुलोरा व शेंगा भरण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यात पाण्याअभावी पिके करपली आहेत. तालुक्यातील सुमारे ४० ते ५० टक्के शेती क्षेत्रावर या पावसाच्या खंडांचा परिणाम झाल्याचा दावा आमदार माने यांनी केला आहे. विशेषतः कोरडवाहू आणि माळभागातील शेतीचे उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा अधिक घटण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
पावसाच्या अनियमिततेचा परिणाम केवळ खरीप हंगामापुरता मर्यादित राहणार नसून, भूजल पातळी खालावल्याने विहिरी आणि कूपनलिका कोरड्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे २०२६-२७ मधील पूर्वहंगामी ऊस, सुरू हंगामातील ऊस आणि रब्बी पिकांच्या उत्पादनावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. आधीच उत्पादन खर्चात वाढ आणि शेतीमालाच्या उत्पन्नाबाबत अनिश्चितता असताना, पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांसमोरील आर्थिक संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि सवलतींची अपेक्षा
दुष्काळ जाहीर करण्यासाठीच्या तांत्रिक अटी आणि प्रत्यक्ष शेतातील परिस्थिती यामध्ये तफावत असल्याने हातकणंगले तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने विशेष निर्णय घ्यावा, अशी मागणी माने यांनी केली आहे. केवळ एका दिवसाच्या पावसाच्या नोंदीमुळे संपूर्ण तालुका दुष्काळाच्या लाभांपासून वंचित राहणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
शासनाने प्रत्यक्ष पीकनुकसान, पावसातील खंड, भूजल पातळी आणि आगामी हंगामावरील संभाव्य परिणाम यांचा एकत्रित विचार करावा. हातकणंगले तालुका विशेष बाब म्हणून दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि आवश्यक सवलती लागू कराव्यात, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.
‘ट्रिगर-३’कडे तालुक्याच्या नजरा
हातकणंगले तालुक्याच्या दुष्काळी परिस्थितीचा मुद्दा आमदार डॉ. अशोकराव माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीदरम्यान उपस्थित केला. यावर मुख्यमंत्र्यांनी लवकरच ‘ट्रिगर-३’मध्ये हातकणंगले तालुक्याचा समावेश करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे माने यांनी सांगितले. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना आता शासनाच्या पुढील निर्णयाची प्रतीक्षा आहे.
यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनय कोरे (सावकर), आमदार अमल महाडीक, समितदादा कदम, विजयसिंह माने (भैय्या) आणि सुहास राजमाने उपस्थित होते. हातकणंगले तालुक्याला दुष्काळी मदत मिळण्यासाठी शासनाकडून प्रत्यक्ष निर्णय कधी घेतला जातो, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.