मुश्रीफांच्या वर्चस्वाला सतेज पाटलांचा धक्का! ‘गोकुळ’ विजयाने राजकीय सत्ताकेंद्राला हादरा
‘गोकुळचा कारभार कोल्हापुरातूनच चालावा’; सतेज पाटलांचा महायुतीवर हल्लाबोल, बाद मतांवरूनही खळबळ
कोल्हापूर | प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने १३-१२ असा विजय मिळवत महायुतीला धक्का दिल्यानंतर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘गोकुळ ही कोल्हापूरची अस्मिता आहे. त्याचा कारभार कोल्हापुरातूनच चालला पाहिजे,’ असे ठणकावून सांगत त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह सत्ताधारी नेत्यांवर निशाणा साधला. हा विजय म्हणजे दूध उत्पादकांनी सत्तेतील नेत्यांच्या राजकारणाला दिलेली चपराक असल्याचे सांगत पाटील यांनी आगामी काळात गोकुळच्या कारभारातून शेतकऱ्यांना न्याय देण्याची ग्वाही दिली. निकालानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी महायुतीतील अंतर्गत संघर्षावरही प्रश्न उपस्थित केले.
गोकुळच्या सत्तासंघर्षात मुश्रीफांसह महायुतीतील दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीचा विजय जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांना कलाटणी देणारा ठरला आहे. सर्वसामान्य दूध उत्पादकांनाही गोकुळमध्ये एकमुखी आणि स्थिर कारभार हवा होता. त्यातूनच मतदारांनी आपल्या आघाडीला कौल दिला, असा दावा पाटील यांनी केला.
‘९८ मते बाद; अन्यथा आणखी जागा जिंकल्या असत्या!’
मतमोजणीतील बाद मतांचा मुद्दा उपस्थित करत पाटील म्हणाले की, जनरल गटातील ९८ मते बाद झाली. त्यापैकी सुमारे २० मतांवर आपल्या ‘शिट्टी’ चिन्हासमोरील शिक्का असल्याचा दावा त्यांनी केला. ही मते बाद झाली नसती, तर आपल्या आघाडीच्या आणखी पाच ते सात जागा निवडून आल्या असत्या, असेही त्यांनी नमूद केले. मतदारांचा कौल आपल्या पॅनेलच्या बाजूने होता, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पराभव खेळाडूवृत्तीने स्वीकारायला हवा होता, असे सांगत त्यांनी फेरमतमोजणीच्या मागणीवरून विरोधकांना लक्ष्य केले. बाद मतांची पडताळणी आधीच झाली होती. त्यामुळे नियमानुसार फेरमतमोजणीची मागणी मान्य होऊ शकत नव्हती आणि अर्ज फेटाळण्यात आले, असे पाटील यांनी स्पष्ट केले. या प्रक्रियेमुळे सुमारे तीन तास वाया गेल्याची टीकाही त्यांनी केली.
‘एकत्रच यायचे होते, तर वाद कशाला?’
महायुतीतील अंतर्गत मतभेदांवर बोट ठेवताना पाटील म्हणाले, ‘तुम्ही एकत्रच येणार होता, तर वाद कशाला केला?’ सत्तेत असल्यामुळे सर्व काही आपलेच आहे, अशा मानसिकतेला दूध उत्पादकांनी निकालातून उत्तर दिले आहे. अरुण डोंगरेंच्या राजकारणाचाही फटका बसला असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. मात्र, आता आपण टीका करण्यात वेळ घालवणार नसून जाहीरनाम्यातील आश्वासने प्रत्यक्षात उतरवण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सहा महिन्यांत बदल दिसणार!
‘ही निवडणूक साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून लढवली. येत्या सहा महिन्यांत जाहीरनाम्यातील आश्वासनांची अंमलबजावणी झालेली दिसेल,’ असे पाटील यांनी सांगितले. नव्या संचालक मंडळाची भूमिका दूध उत्पादकांना न्याय देण्याची असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
गोकुळच्या विजयाने सतेज पाटील यांनी जिल्ह्याच्या सहकार राजकारणात आपले नेतृत्व पुन्हा अधोरेखित केले आहे. दुसरीकडे, महायुतीतील मतभेद, बाद मतांचा वाद आणि नेतृत्वाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न यामुळे या निकालाचे राजकीय पडसाद आगामी काळातही उमटण्याची चिन्हे आहेत.