ऊस आंदोलनातील गुन्हे विनामूल्य लढविणार; जयसिंगपूर बार असोसिएशनचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा!
साखर ५० रुपये किलो, सी-हेव्ही इथेनॉलला ७० रुपये प्रतिलिटर दराची मागणी; राजू शेट्टींकडून वकिलांचे आभार
जयसिंगपूर / प्रतिनिधी
साखरेचे किमान विक्री मूल्य (एमएसपी) प्रतिकिलो ५० रुपये आणि सी-हेव्ही इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७० रुपये करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र व कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे गेल्या चार दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आता कायदेविषयक पाठबळही मिळाले असून, आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर दाखल होणारे सर्व गुन्हे विनामूल्य लढविण्याची महत्त्वपूर्ण घोषणा जयसिंगपूर बार असोसिएशनने केली आहे. या निर्णयामुळे आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
साखरेचे किमान विक्री मूल्य आणि इथेनॉलच्या दरात वाढ करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी लावून धरली आहे. या मागण्यांसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकरी आक्रमक झाले असून, आंदोलनाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे.
कर्नाटकातील हत्तरकी टोल नाक्यापासून हुबळी येथील केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानापर्यंत लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पदयात्रा सुरू आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात येत आहे. साखर आणि इथेनॉलच्या दरवाढीचा निर्णय होईपर्यंत आंदोलनाची धग कायम ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर बार असोसिएशनने आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर जेवढे गुन्हे दाखल होतील, ते सर्व गुन्हे बार असोसिएशनचे वकील विनामूल्य लढविणार असल्याचे जाहीर करण्यात आले. शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या लढ्याला कायदेशीर मदत देण्याच्या या भूमिकेचे स्वागत होत आहे.
दरम्यान, जयसिंगपूर बार असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि वकिलांनी आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल माजी खासदार राजू शेट्टी यांनी मनापासून आभार मानले. शेतकऱ्यांच्या हक्काच्या लढ्यात विविध घटकांकडून मिळणारा पाठिंबा आंदोलनाला बळ देणारा ठरत आहे. आता केंद्र सरकार साखरेच्या किमान विक्री मूल्याबाबत आणि इथेनॉलच्या दराबाबत कोणता निर्णय घेते, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.