ऊस दराचा भडका! ३१ तासांनंतर महामार्गावरील चक्काजाम मागे; लढा आता केंद्रीय मंत्र्यांच्या दारात!

Spread the love

ऊस दराचा भडका! ३१ तासांनंतर महामार्गावरील चक्काजाम मागे; लढा आता केंद्रीय मंत्र्यांच्या दारात!

हुबळीकडे शेतकरी पदयात्रा; सातारा-सांगलीतील कारखान्यांना ‘काटा बंद’चा इशारा, ऊसतोड रोखण्याचा राजू शेट्टींचा निर्धार

कोगनोळी / प्रतिनिधी

साखरेचा किमान विक्री दर (एमएसपी) वाढवावा आणि उसाला रास्त भाव मिळावा, या मागणीसाठी पेटलेला शेतकरी आंदोलनाचा वणवा आता नव्या टप्प्यावर पोहोचला आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सलग ३१ तास ठिय्या देत चक्काजाम करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन महामार्गावरील आंदोलन मागे घेतले असले, तरी सरकारविरोधातील संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार केला आहे. आता थेट केंद्रीय मंत्र्यांच्या दारात धडक देण्यासाठी शेतकरी पदयात्रा सुरू झाली असून, सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील दर निश्चित न करता गळीत हंगाम सुरू करणाऱ्या कारखान्यांविरोधात ‘काटा बंद’ आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. त्यामुळे ऊस दराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

साखरेच्या किमान विक्री मूल्याच्या मागणीवर केंद्र सरकारसोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात शेतकऱ्यांचा उद्रेक झाला. कोगनोळी आणि हत्तरकी टोल नाक्यांवर हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले. सलग ३१ तास सुरू असलेल्या आंदोलनामुळे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. वाहनांच्या मैलोन्मैल रांगा लागल्याने प्रवासी, वाहनचालक आणि अत्यावश्यक कामांसाठी प्रवास करणाऱ्यांचे मोठे हाल झाले. अखेर महामार्गावरील चक्काजाम मागे घेण्यात आला; मात्र मागण्यांचा निर्णय होईपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.

केंद्रीय मंत्र्यांच्या निवासस्थानावर धडक

महामार्गावरील आंदोलन मागे घेतल्यानंतर कर्नाटक राज्य रयत संघाचे प्रमुख चुन्नाप्पा पुजारी यांनी बेळगावजवळील हत्तरकी टोल नाक्याहून पदयात्रेला सुरुवात केली. ही पदयात्रा केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हुबळी येथील निवासस्थानापर्यंत नेण्यात येणार आहे. साखरेच्या किमान विक्री मूल्याबाबत केंद्र सरकारने ठोस निर्णय घ्यावा, यासाठी हा दबावतंत्राचा पुढील टप्पा मानला जात आहे.

महामार्गावरील आंदोलनामुळे सरकारचे लक्ष वेधल्यानंतर आता केंद्रीय मंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत पदयात्रा काढून प्रश्नाचा निकाल लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे सीमाभागातील शेतकरी आंदोलनाची धग कायम आहे.

कारखानदारांविरोधात राजू शेट्टी आक्रमक

दरम्यान, महाराष्ट्रातील सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील काही साखर कारखान्यांनी उसाच्या दराबाबत निर्णय न घेताच गळीत हंगाम सुरू केल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला. शेतकऱ्यांना दराची हमी न देता कारखाने सुरू करणे अन्यायकारक असल्याचे सांगत त्यांनी संबंधित कारखानदारांवर जोरदार टीका केली.

काही कारखानदार राजकीय दबाव आणि चौकशीच्या भीतीमुळे घाईघाईने हंगाम सुरू करीत असल्याचा आरोपही शेट्टी यांनी केला. अशा कारखानदारांना शेतकऱ्यांची ताकद दाखवून देण्यासाठी सातारा आणि सांगली जिल्ह्यांत उद्यापासून ‘काटा बंद’ आंदोलन सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला. ऊस वजन काटे बंद पाडण्यासह ऊसतोड रोखण्याची भूमिका त्यांनी जाहीर केली. दोन दिवसांनंतर महाराष्ट्रातील कार्यकर्ते हुबळी येथील पदयात्रेत सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या एकजुटीचे दर्शन

कोगनोळी आणि हत्तरकी टोल नाक्यांवरील आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी महामार्गावरच स्वयंपाक करून सामूहिक भोजनाची व्यवस्था केली. परिसरातील गावांतून भाकरी, पाणी, दूध, भाजीपाला आणि अन्य खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणावर पाठविण्यात आले. हजारो आंदोलकांच्या भोजनाची व्यवस्था ग्रामस्थ आणि समर्थकांनी एकजुटीने केली. शिल्लक राहिलेले अन्न आणि पाणी पदयात्रेच्या ठिकाणी पाठविण्यात आले.

या आंदोलनामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा आणि बेळगाव जिल्ह्यांतील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. पोलिसांनी पर्यायी मार्गांचा अवलंब केला असला, तरी प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. आता महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असताना, दुसरीकडे हुबळीकडे निघालेली पदयात्रा आणि महाराष्ट्रातील कारखान्यांविरोधातील ‘काटा बंद’चा इशारा यामुळे ऊस दराचा संघर्ष आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.

महामार्गावरील चक्काजाम थांबला; पण शेतकऱ्यांचा लढा थांबलेला नाही. केंद्र सरकारने साखरेच्या किमान विक्री मूल्याबाबत आणि ऊस उत्पादकांच्या प्रश्नांबाबत ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलनाचे पुढील टप्पे अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!