बदलत्या शैक्षणिक आव्हानांना सामोरे जाण्याचे डॉ. केदार मारुलकर यांचे आवाहन
हातकणंगले / प्रतिनिधी
शिक्षण क्षेत्रात आपल्या ज्ञान, कार्यकौशल्य आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या बांधिलकीतून उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षकांचा गौरव इचलकरंजी येथील आपटे वाचन मंदिराच्या वतीने करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून २८ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या गुणवंत शिक्षक सन्मान सोहळ्यात श्री अण्णासाहेब डांगे महाविद्यालय, हातकणंगले येथील प्राध्यापिका सौ. हेमांगी वडेर यांच्यासह विविध शैक्षणिक संस्थांतील शिक्षकांचा गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
शिवाजी विद्यापीठाच्या कॉमर्स व मॅनेजमेंट विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. केदार मारुलकर यांच्या हस्ते गुणवंत शिक्षकांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. मारुलकर यांनी अंगणवाडीपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. शिक्षण क्षेत्रासमोरील आव्हाने सातत्याने बदलत आहेत. त्यामुळे शिक्षकांनीही काळानुरूप स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे गरजेचे आहे. तंत्रज्ञान, सामाजिक बदल आणि विद्यार्थ्यांच्या बदलत्या गरजांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून अध्यापन अधिक प्रभावी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या पुरस्काराने सन्मानित झालेल्या शिक्षकांमध्ये डी.के.टी.ई.च्या प्रा. डॉ. विनायक गायकवाड, श्री अण्णासाहेब डांगे महाविद्यालय, हातकणंगलेच्या प्राध्यापिका सौ. हेमांगी वडेर, गोविंदराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे डॉ. राहुल कुलकर्णी, गंगामाई विद्या मंदिरच्या सौ. वर्षा निशाणदार तसेच श्री शांतिनाथ बाल विद्या मंदिरच्या सौ. लता चौगुले यांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुणे डॉ. केदार मारुलकर यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ग्रंथालयाचे उपाध्यक्ष काशिनाथ जगदाळे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक ग्रंथालयाचे कार्यवाह मोहन पुजारी यांनी केले. संस्थेचे सहकार्यवाह प्रा. डॉ. सुजित सौंदत्तीकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. राजेंद्र घोडके यांनी आभार मानले, तर सौ. मिनाक्षी तंगडी यांनी सूत्रसंचालन केले.
शिक्षकांच्या कार्याचा सन्मान करून त्यांच्या योगदानाची दखल घेण्याबरोबरच नव्या पिढीला गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षकांना प्रेरणा देणारा हा उपक्रम ठरला. कार्यक्रमास इचलकरंजी व परिसरातील विविध शाळा-महाविद्यालयांतील शिक्षक, पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे कुटुंबीय, वाचन मंदिराचे पदाधिकारी तसेच वाचकप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.