अंकली पुलावरील खड्डे बुजवण्यासाठी ५४० रुपयांचा खर्च; डॉ. मुबीन मुल्ला यांची गांधीगिरी

Spread the love

प्रकल्प अधिकारी व प्रशासनाच्या कारभारावर संताप; ‘नागरिकांनी कर भरायचा, मग हाल का सोसायचे?’

उदगाव / प्रतिनिधी

सांगली-कोल्हापूर महामार्गावरील अंकली पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांसह नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असताना प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी डॉ. मुबीन शौकत मुल्ला (आष्टेकर) यांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबला आहे. तब्बल ५४० रुपये स्वतःच्या खिशातून खर्च करून त्यांनी अंकली पुलावरील खड्डे बुजवले. प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी केलेल्या या कृतीची परिसरात चर्चा सुरू झाली आहे.

सांगली-कोल्हापूर महामार्गावर दररोज हजारो वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र अंकली पुलावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. रस्त्याच्या दुरवस्थेचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होत असल्याचा आरोप डॉ. मुल्ला यांनी केला.

नागरिक वाहन कर, रस्ता कर यांसह विविध प्रकारचे कर भरतात. तरीही त्यांना खराब रस्त्यांमुळे त्रास सहन करावा लागत असेल, तर प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी प्रशासनाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे रस्त्यांची नियमित पाहणी करून खड्डे तातडीने बुजवणे ही संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे, असे डॉ. मुल्ला यांनी स्पष्ट केले.

‘नागरिक हा विकासाचा केंद्रबिंदू आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये, याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली पाहिजे,’ असे सांगत त्यांनी प्रशासनाला इशारा दिला. यापुढे अंकली पुलासह महामार्गावर पुन्हा खड्डे दिसल्यास तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

प्रकल्प अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास प्रशासनाच्या निषेधार्थ बैलगाडी आंदोलन करण्यात येईल. रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र आंदोलन उभारावे लागल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांची असेल, असा इशारा डॉ. मुल्ला यांनी दिला.

दरम्यान, स्वतःच्या खर्चातून खड्डे बुजवण्याची वेळ नागरिकांवर येणे ही प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत असून, महामार्ग प्रशासन आता या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!