कोपेश्वर मंदिर परिसरात उत्खननात मूर्तीचा शिरोभाग सापडला पुरातन विभागासह इतिहास अभ्यासकांमध्ये उत्सुकता

Spread the love

बौद्धकालीन इतिहासावर प्रकाश पडण्याची शक्यता, अधिक संशोधनाची मागणी

खिद्रापूर / प्रतिनिधी

खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक कोपेश्वर मंदिर परिसरात उत्खननादरम्यान मूर्तीचा शिरोभाग सापडल्याने पुरातन वास्तू व इतिहास अभ्यासकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.मंदिर परिसरात सुरू असलेल्या कामासाठी पाया खुदाई करताना शनिवारी सकाळी कामगारांना हा शिरोभाग आढळून आला.घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व पुरातन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून शिरोभाग सुरक्षितरीत्या मंदिरात ठेवला आहे.

कोपेश्वर मंदिर परिसरात सध्या पुरातन खात्याच्या माध्यमातून सुशोभीकरणासह विविध विकासकामे सुरू आहेत.या कामासाठी पाया खोदताना जमिनीखाली हा शिरोभाग आढळला. कामगारांनी तत्काळ संबंधित प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर हा पुरातन अवशेष सुरक्षित ठेवण्यात आला असून राज्य पुरातन विभागालाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.

सापडलेला शिरोभाग नेमका कोणत्या देवतेच्या मूर्तीचा आहे, त्याचा कालखंड कोणता आणि मंदिर परिसरातील त्याचे ऐतिहासिक महत्त्व काय, याबाबत इतिहास अभ्यासक आणि पुरातन मूर्ती अभ्यासकांमध्ये उत्सुकता आहे. प्रथमदर्शनी हा शिरोभाग बौद्ध मूर्तीच्या स्वरूपाशी साधर्म्य दर्शवित असल्याची चर्चा असून, त्यामुळे खिद्रापूर परिसरातील प्राचीन इतिहासाच्या अभ्यासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत निष्कर्ष काढण्यासाठी तज्ज्ञांकडून शास्त्रीय पद्धतीने अभ्यास होणे आवश्यक आहे.

एक हजार वर्षांहून अधिक पुरातन असलेल्या कोपेश्वर महादेव मंदिराला वास्तुकला आणि शिल्पकलेच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून, संपूर्ण मंदिर १०८ हत्तींच्या शिल्पांवर आधारित आहे. स्वर्गमंडप, गर्भमंडप, अंतराळ आणि गाभारा अशी मंदिराची रचना आहे. गाभाऱ्यात कोपेश्वर महादेव व धोपेश्वर विष्णू अशी दोन शिवलिंगे आहेत.

मंदिराच्या बाह्य भिंतींवर देवदेवतांसह नृत्य, गायन, वादन तसेच तत्कालीन सामाजिक जीवनाचे दर्शन घडविणारी विविध शिल्पे कोरण्यात आली आहेत. त्यामुळे नव्याने सापडलेल्या शिरोभागाचे पुरातत्त्वीय व ऐतिहासिक महत्त्व तपासण्यासाठी सखोल उत्खनन व संशोधन करण्याची मागणी इतिहासप्रेमी आणि अभ्यासकांतून होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!