मौजे वडगावच्या स्मशानभूमीत पुन्हा अघोरी प्रकार; बाहुली, सुया, टाचण्या आढळल्याने खळबळ

Spread the love

अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांना दिसले जादूटोण्याचे साहित्य; अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कारवाईची मागणी

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील स्मशानभूमीत अज्ञात व्यक्तीकडून अघोरी कृत्य करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. स्मशानभूमीतील शवदाहिनीजवळ काळ्या कापडात बांधलेली बाहुली, तिला टोचलेल्या सुया व टाचण्या, तसेच नारळ, लिंबू, हळद-कुंकू आदी साहित्य आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर संताप व्यक्त करण्यात आला. वारंवार अशा घटना घडत असल्याने अंधश्रद्धा पसरवणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

मौजे वडगाव येथील एका ज्येष्ठ नागरिकाच्या अंत्यसंस्कारासाठी शुक्रवारी ग्रामस्थ आणि नातेवाईक स्मशानभूमीत जमले होते. यावेळी शवदाहिनीजवळ काळ्या कापडात बांधलेले मोठे गाठोडे नागरिकांच्या नजरेस पडले. त्याची पाहणी केली असता, त्यामध्ये लाल रंगाच्या दोऱ्याने गुंडाळलेली बाहुली आढळून आली. या बाहुलीला अनेक सुया आणि टाचण्या टोचण्यात आल्या होत्या.

तसेच जवळच नारळ, लिंबू, हळद-कुंकू आणि पूजाविधीशी संबंधित अन्य साहित्यही आढळले. स्मशानभूमीसारख्या संवेदनशील ठिकाणी अशा प्रकारचे साहित्य आढळल्याने उपस्थित नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त युवकांनी तत्काळ ते साहित्य तेथून बाजूला केले.

 अघोरी प्रकारांची पुनरावृत्ती; ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण

मौजे वडगावच्या स्मशानभूमीत अशा प्रकारची घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वीही याच परिसरात अशाच स्वरूपाचा प्रकार उघडकीस आला होता. याशिवाय लगतच्या नागाव आणि पुलाची शिरोली परिसरातील स्मशानभूमींमध्येही अशा घटना घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या घटनांमागे नेमके कोण आहे, याबाबत परिसरात विविध चर्चा सुरू आहेत.

स्मशानभूमीसारख्या सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे जादूटोण्याचे साहित्य टाकून नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे का, याचा तपास होणे गरजेचे आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असून, अशा कृत्यांमागील व्यक्तींचा शोध घेण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

 पोलिसांनी सखोल चौकशी करून पर्दाफाश करण्याची मागणी

समाजात अंधश्रद्धा आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या अशा कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी. स्मशानभूमी परिसरातील घटनांची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तींचा शोध घ्यावा आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांचा कायमस्वरूपी छडा लावून नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!