जीवनात निश्चित उद्दिष्ट ठरवून अभ्यासावर भर द्या – सहाय्यक पोलिस निरीक्षक शितलकुमार डोईजड

Spread the love

कन्या विद्या मंदिर हेरवाडचा ६७ वा वर्धापन दिन उत्साहात

हेरवाड / प्रतिनिधी

लहान वयात लागलेल्या चांगल्या सवयी आयुष्यभराची शिदोरी ठरतात. त्यामुळे विद्यार्थिनींनी सकाळी लवकर उठणे, नियमित अभ्यास करणे, आई-वडिलांचे ऐकणे आणि अवांतर वाचनाची सवय लावून घेणे आवश्यक आहे. जीवनात निश्चित उद्दिष्ट ठरवून त्या दिशेने सातत्याने प्रयत्न करावेत, असा प्रेरणादायी संदेश कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शितलकुमार डोईजड यांनी दिला.

शिरोळ तालुक्यातील कन्या विद्या मंदिर, हेरवाड शाळेचा ६७ वा वर्धापन दिन तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आयोजित संयुक्त कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रेखा जाधव होत्या.

डोईजड म्हणाले, महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांनी देशासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या विचारांचे स्मरण केवळ राष्ट्रीय सणांपुरते मर्यादित न राहता दैनंदिन जीवनातही झाले पाहिजे. पूर्वीच्या काळात भारतीयांना गुलामगिरीत जीवन जगावे लागत होते. आज आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत. मात्र, स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार असा होत नाही. मिळालेल्या स्वातंत्र्याचा योग्य आणि जबाबदारीने वापर करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

विद्यार्थिनींनी विचारलेल्या विविध प्रश्नांना डोईजड यांनी समर्पक उत्तरे दिली. अभ्यासाबरोबरच अवांतर वाचन केल्याने सामान्यज्ञान वाढते, व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते आणि आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे विद्यार्थिनींनी मोबाईल व इतर अनावश्यक गोष्टींपेक्षा अभ्यास, वाचन आणि ज्ञानार्जनाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

शाळेचा वर्धापन दिन विद्यार्थिनींसाठी ठरला आनंदाचा सोहळा

शाळेच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त बालसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थिनींनी मनोगते व्यक्त करून शाळेविषयीच्या आठवणी आणि भावना मांडल्या. वर्धापन दिनानिमित्त शाळेची इमारत आकर्षक स्वागत कमान, नयनरम्य रांगोळी आणि फुलांच्या माळांनी सजविण्यात आली होती. या सजावटीमुळे संपूर्ण शाळेचा परिसर उत्सवी वातावरणाने न्हाऊन निघाला होता. सर्व विद्यार्थिनींना मिष्टान्न भोजन देण्यात आले.

विद्यार्थिनींच्या गुणवत्तावाढीसाठी विविध स्तरांवर सहकार्य करणाऱ्या दानशूर व्यक्तींचा यावेळी गौरव करण्यात आला. वर्धापन दिनाच्या भोजनासाठी सहकार्य करणारे माजी तंटामुक्त अध्यक्ष तथा शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सुभाष देबाजे यांचा सत्कार करण्यात आला. गुणवत्तावाढीसाठी १४ हजार रुपयांच्या ठेवीच्या व्याजातून ‘ताराश्री पारितोषिक’ देण्यासाठी देणगी देणारे ग्रामपंचायत सदस्य भरत श्रीपती पोवार तसेच टेबल फॅन भेट देणाऱ्या राधिका सुरेश चव्हाण यांचाही सत्कार करण्यात आला.

शालेय पोषण आहाराच्या कामात योगदान देणाऱ्या मदतनीस राधिका चव्हाण, आस्मिता पोवार आणि राणी पोवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. केंद्रप्रमुख सुभाष कुरुंदवाडे यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ताधारक ठरणाऱ्या विद्यार्थिनींना स्वखर्चातून पारितोषिके देण्याचे जाहीर केले.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ‘शर्मिला मंडप’चे मनोजकुमार कांबळे यांनी डेकोरेशनचे, तर दादासो कुमार पाटील यांनी झेंडूच्या फुलांच्या सजावटीचे विशेष सहकार्य केले.

मुख्याध्यापक सुभाष तराळ यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या वाटचालीचा आढावा घेतला. सूत्रसंचालन दिलीप शिरढोणे यांनी केले. कार्यक्रमास सहाय्यक फौजदार गजानन पाटील, उपसरपंच छाया सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील, अफसर मकानदार, विद्या माने, विजयमाला पाटील, शितल कांबळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमजान नदाफ, शुभांगी विक्रमसिंह देसाई, मयूरी माळी, स्मिता सुतार, कविता आलासे, अश्विनी उगारे, आबा देसाई, साहित्यिक महादेव माने (भिलवडी), अॅड. तातीयाना माने, प्रा. कु. श्रद्धा शिरढोणे, मुख्याध्यापक शामराव कांबळे, अशोक कोळी, दत्तात्रय कचरे, चंद्रकांत कांबळे, संजय माळी, शारदा पाटील, वर्षा सुतार, बाबालाल बाणदार, गुंडा परीट, गीता ढवळे, ज्योती परीट, सुनिता लठ्ठे, धनश्री होनमाने, प्रेरणा मोरे यांच्यासह अंगणवाडी सेविका, मदतनीस, पालक आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

शाळेचा ६७ वर्षांचा शैक्षणिक प्रवास, विद्यार्थिनींच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारे उपक्रम आणि ग्रामस्थांचे लाभलेले सहकार्य यामुळे वर्धापन दिनाचा सोहळा शैक्षणिक, सामाजिक आणि प्रेरणादायी वातावरणात उत्साहात पार पडला.

Leave a Comment

error: Content is protected !!