हेरवाड / प्रतिनिधी
हेरवाडच्या मातीत घडलेला हरहुन्नरी, शीलवान आणि जिद्दी क्रिकेटपटू ओम दयानंद पाटील याची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे कुटुंबीयांसह हेरवाड ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून, ग्रामीण भागातील युवा खेळाडूंसाठी ओमची ही निवड प्रेरणादायी ठरली आहे.
ओमच्या यशामागे प्रचंड मेहनत, सातत्यपूर्ण सराव, जिद्द आणि प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानण्याची वृत्ती आहे. दुखापतीमुळे शरीर साथ देत नसतानाही त्याने खचून न जाता वेदनांवर मात करत सराव सुरू ठेवला. कठीण परिस्थितीतही ध्येयापासून विचलित न होता त्याने आपल्या कामगिरीत सातत्य राखले. त्यामुळे महाराष्ट्राच्या संघापर्यंत पोहोचण्याचे त्याचे स्वप्न अखेर साकार झाले.
ओमच्या क्रिकेटमधील गुणवत्ता लहानपणीच त्याचे काका प्रा. रवींद्र पाटील यांनी ओळखली. त्यांनी त्याला क्रिकेट क्षेत्रात पुढे जाण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन दिले. त्याचबरोबर आई-वडिलांचा खंबीर पाठिंबा,सिद्धिविनायक क्रिकेट अकॅडमी आणि प्रशिक्षक उत्तम तनंगे यांचे मार्गदर्शन ओमच्या जडणघडणीत महत्त्वाचे ठरले.
तसेच कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष छत्रपती संभाजी राजे महाराज आणि असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य त्याला लाभले.सविंच क्रिकेट अकॅडमीचे प्रथमेश डंबे सर आणि विशाल पाटील सर यांचेही मार्गदर्शन त्याच्या क्रिकेट प्रवासात महत्त्वपूर्ण ठरले.
क्रिकेटमध्ये शारीरिक क्षमतेसोबत मानसिक ताकदही तितकीच महत्त्वाची असते. कठीण प्रसंगात आत्मविश्वास कायम ठेवण्यासाठी आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी माईंड ट्रेनर अजितकुमार पाटील यांचे मार्गदर्शन ओमला लाभले.
ओमची महाराष्ट्र संघातील निवड ही केवळ एका खेळाडूची कामगिरी नसून, ग्रामीण भागातील तरुणांच्या स्वप्नांना मिळालेली नवी उमेद आहे. गावच्या मातीतूनही मोठी स्वप्ने पाहून ती जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर साकार करता येतात, हे ओमने आपल्या यशातून दाखवून दिले आहे.
ओमच्या या यशाबद्दल हेरवाड ग्रामस्थांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्याची क्रिकेटमधील ही भरारी भविष्यात राष्ट्रीय पातळीवरही झेपावो, अशा शुभेच्छा देण्यात येत आहेत.