जयसिंगपूर / प्रतिनिधी
सामाजिक कार्य, कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीही यशाचे शिखर गाठू शकते, याचे प्रेरणादायी उदाहरण डॉ. मोबीन मुल्ला आष्टेकर यांनी समाजासमोर ठेवले आहे.डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी डॉ.मोबीन मुल्ला आष्टेकर यांच्या जयसिंगपूर येथील निवासस्थानी भेट देत त्यांचा फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.यावेळी शेट्टी यांनी डॉ.मुल्ला यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी राजू शेट्टी यांनी आष्टेकर कुटुंबाशी असलेल्या जुन्या स्नेहाच्या आठवणींना उजाळा दिला. आष्टेकर कुटुंबाची संपूर्ण शहरात टेलर म्हणून असलेली ओळख त्यांनी आवर्जून सांगितली. आपल्या महाविद्यालयीन जीवनातील आठवण सांगताना, “कॉलेजला असताना आम्ही याच दुकानातून कपडे शिवून घालायचो,” असे सांगत शेट्टी यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. कष्टातून उभ्या राहिलेल्या या कुटुंबातील व्यक्तीने सामाजिक क्षेत्रात मिळविलेले यश विशेष अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
सामान्य कुटुंबातील पार्श्वभूमी, व्यवसायातील कष्ट आणि त्यातून पुढे येत सामाजिक कार्याची वाट धरून डॉक्टरेटपर्यंत मजल मारणे, ही बाब समाजातील तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले. परिस्थिती कोणतीही असो, ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न केल्यास यश मिळविता येते, हा संदेश डॉ. मुल्ला यांच्या यशातून अधोरेखित होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
राजू शेट्टी यांनी डॉ.मुल्ला यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची माहिती घेतली.जुन्या परिचयाच्या व्यक्तीच्या यशाचा आनंद व्यक्त करत शेट्टी यांनी कुटुंबीयांचेही अभिनंदन केले.
यावेळी माजी नगरसेवक शैलेश चौगुले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष शंकर नाळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, मित्रपरिवार व कुटुंबीय उपस्थित होते. डॉ. मोबीन मुल्ला यांच्या डॉक्टरेट पदवीच्या निमित्ताने झालेल्या या सत्कारामुळे आष्टेकर कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले.