गुरुपौर्णिमेनिमित्त नृसिंहवाडीत दत्तभक्तांची अलोट गर्दी; श्रीदत्त नामघोषाने परिसर दुमदुमला

Spread the love

नृसिंहवाडी / प्रतिनिधी

श्री गुरुदत्ताचे पवित्र स्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त हजारो भाविकांनी श्रीदत्त दर्शनासाठी मोठी गर्दी केली. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा तसेच आंध्र प्रदेशातील दत्तभक्तांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ आणि ‘श्री गुरुदेव दत्त’च्या अखंड जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.

पहाटे साडेचार वाजता काकड आरतीने धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात झाली. त्यानंतर षोडशोपचार पूजा, पंचामृत अभिषेक, पादुका महापूजा, पवमान पठण, धूपदीप आरती व शेजारती असे विविध धार्मिक विधी आयोजित करण्यात आले. कृष्णा-पंचगंगा संगमावर स्नान करून भाविकांनी गुरुपूजन व श्रीदत्तांचे दर्शन घेतले.

गुरुपूजनाचा सोहळा येथील प्रमुख पूजारी मानकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.आज पासून चातुर्मास प्रारंभ झाल्याने गुरुवारपासून पारंपरिक पालखी सोहळा स्थगित करण्यात आला असून, त्याऐवजी इंदुकोटी आरती-पूजा विधी सुरू करण्यात आल्याची माहिती देवस्थान प्रशासनाने दिली.

दरम्यान कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने मंदिराच्या सभा मंडपात पाणी आले आल्याने आपत्ती व्यवस्थापन व देवस्थान मार्फत बंदोबस्त केला आहे.तसेच भाविकांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर दत्त देव संस्थानतर्फे दर्शनरांग, मुखदर्शन व्यवस्था, क्लोज सर्किट टीव्ही, ध्वनीक्षेपक यंत्रणा, सुरक्षा रक्षक, सूचना फलक तसेच मोफत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.

दर्शनासाठी उत्तर घाटापासून रांगा लागल्या होत्या. गर्दीचे नियोजन करण्यासाठी चार स्वतंत्र दर्शनरांगा करण्यात आल्या. पार्किंगची जागा सकाळपासूनच वाहनांनी भरून गेली होती. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून कुरुंदवाड आगारासह कोल्हापूर, सांगली, मिरज, कागल, इचलकरंजी, संभाजीनगर, गगनबावडा आदी आगारांतून जादा एसटी बसफेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती.

गुरुपौर्णिमेचा उत्सव शांततेत व भक्तिमय वातावरणात पार पाडण्यासाठी श्री दत्त देवस्थान,ग्रामपंचायत, शिरोळ पोलीस ठाणे यांनी मुख्य मार्गावर एकेरी वाहतूक व्यवस्था करण्यात येणार आहे. बहुमजली पार्किंग भरल्यानंतर माहेश्वरी भवन, पाटील महाराज मठ, जगदाळे प्लॉट, कॉलेज परिसर येथे वाहनतळ व्यवस्था करण्यात आली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!