कुटवाड / प्रतिनिधी
कुटवाड गावात आषाढी एकादशीचा पवित्र उत्सव भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने श्री विठ्ठल मंदिरात पहाटे अभिषेक,हरिनामाचा गजर,भजन तसेच महाआरतीचे आयोजन करण्यात आले.दिवसभर मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होती.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने जानाई महिला भजनी मंडळाच्या पुढाकाराने तसेच गावातील महिलांच्या उत्स्फूर्त सहभागातून पारंपरिक दिंडीचे आयोजन करण्यात आले.भगव्या पताका,टाळ-मृदंगाचा निनाद आणि विठ्ठल नामाच्या अखंड गजरात निघालेल्या दिंडीमुळे संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले. पालखीच्या सानिध्यात दिंडीने गावातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण केले.मगदूम मळा,मेथे मळा आदी परिसरातून दिंडी फिरत श्री विठ्ठल मंदिरात दाखल झाली.
मंदिर परिसरात पोहोचल्यानंतर महिलांनी पारंपरिक गोल रिंगण, फुगडी तसेच विविध सांस्कृतिक आणि भक्तिमय खेळ सादर केले. विठ्ठल-रुक्मिणीच्या जयघोषाने आणि अभंगांच्या सुरेल गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. महिलांचा उत्साह आणि भाविकांची श्रद्धा यामुळे यंदाचा आषाढी एकादशी उत्सव विशेष आकर्षण ठरला.
कार्यक्रमाच्या समारोपानंतर उपस्थित भाविकांसाठी फराळ तसेच खिचडीचे वाटप करण्यात आले.गावातील नागरिकांनी या धार्मिक उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होत आयोजनास सहकार्य केले.भक्ती,परंपरा आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संगम घडवून आणणारा हा उत्सव ग्रामस्थांच्या स्मरणात कायम राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.