शिरोळ / प्रतिनिधी
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त शिरोळ येथील पुरातन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दिवसभर भक्तांचा जनसागर उसळला होता. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी मोठी रांग लावली होती.”जय हरी विठ्ठल”, “श्री राम कृष्ण हरी”, “बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल”, “श्री ज्ञानदेव तुकाराम” अशा अखंड नामघोषात संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला.आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर,आमदार डॉ अशोकराव माने,दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव (दादा) पाटील, उपगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, माजी आमदार उल्हास पाटील, तहसीलदार अनिलकुमार हेळकर, पोलीस निरीक्षक पी.एस.शिंदे यांच्यासह हजारो वारकरी आणि भाविकांनी विठ्ठल-रुक्मिणी माऊलींचे दर्शन घेऊन सुख,समृद्धी,आरोग्य व शांतीची प्रार्थना केली.
आषाढी एकादशीनिमित्त मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाई आणि रंगीबेरंगी फुलांच्या सजावटीने उजळून निघाला होता.मंदिराच्या गाभाऱ्यात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीची मनोहारी आरास करण्यात आली होती. या आकर्षक सजावटीमुळे मंदिराचे सौंदर्य अधिक खुलून दिसत होते.दिवसभर भाविकांनी दर्शनासोबत पूजा-अर्चा, अभिषेक आणि आरतीमध्ये मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला.
यावेळी देसाई परिवाराच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणी माऊलींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले.सौ. व श्री.गजानन संकपाळ तसेच सौ. व श्री. यशवंत उर्फ बंटी देसाई यांच्या हस्ते सहकुटुंब श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीचा अभिषेक, पूजन व महाआरती करण्यात आली. त्यानंतर देसाई परिवाराने उपस्थित मान्यवर आणि भाविकांचे स्वागत केले.
सायंकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून पारंपरिक वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले असून टाळ-मृदुंगाच्या निनादात,विठ्ठल नामाच्या गजरात आणि अभंगांने संपूर्ण शहर वातावरण भक्तिमय झाले आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने मंदिरात प्रवचन,कीर्तन,भजन,नामस्मरण आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.दिवसभर सुरू असलेल्या या कार्यक्रमांमुळे मंदिर परिसरात अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते.लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटातील भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विठ्ठल भक्तीचा आनंद अनुभवला.
या धार्मिक सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी देसाई परिवारातील ज्येष्ठ रावसाहेब देसाई,धनाजीराव देसाई, जयसिंगराव देसाई,शशिकांत देसाई, यशवंत उर्फ बंटी देसाई,पृथ्वीराज देसाई, धीरज देसाई, राजकुमार देसाई,विश्वजीत देसाई,पृथ्वीराज देसाई,यशोधन देसाई,बाळासाहेब जगदाळे,आप्पासो हंकारे,प्रसाद कदम यांच्यासह भक्तगणांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनामुळे सर्व धार्मिक कार्यक्रम शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने शिरोळ नगरी संपूर्ण दिवस विठ्ठलमय झाली होती.भक्ती,श्रद्धा,नामस्मरण आणि वारकरी परंपरेचा अनोखा संगम अनुभवत भाविकांनी विठुरायाच्या चरणी कृतज्ञतेने नतमस्तक होत आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला.