आणखी किती निष्पाप शेतकऱ्यांचे बळी गेल्यानंतर महावितरणला जाग येणार? -कॉ. आप्पा पाटील 

Spread the love

आणखी किती निष्पाप शेतकऱ्यांचे बळी गेल्यानंतर महावितरणला जाग येणार? -कॉ. आप्पा पाटील

महावितरणच्या हलगर्जीपणाचा दुसरा बळी; अब्दुलाटमध्ये युवा शेतकऱ्याचा मृत्यू, संतापाचा उद्रेक

दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून बडतर्फीची मागणी; धोकादायक डीपी व जीर्ण वीजतारा तातडीने बदलण्याची जोरदार मागणी

अब्दुलाट / प्रतिनिधी 

अब्दुलाट परिसरात महावितरणच्या कथित गलथान आणि निष्काळजी कारभारामुळे एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. वारंवार सूचना करूनही धोकादायक ठरत असलेल्या वीजतारा, जीर्ण विद्युत डीपी आणि प्रलंबित दुरुस्तीच्या कामांकडे महावितरणने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थ व शेतकरी करत असून या घटनेनंतर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अब्दुलाट परिसरात अनेक ठिकाणी तुटलेल्या व जीर्ण झालेल्या वीजतारा शेतामध्ये लोंबकळत आहेत. अनेक विद्युत डीपी धोकादायक अवस्थेत असून याबाबत वारंवार तक्रारी करूनही महावितरणकडून वेळेत उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. परिणामी निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याचा आरोप होत आहे.

यापूर्वीही अशाच प्रकारच्या निष्काळजीपणामुळे एका पाठकरी शेतामधून जात असताना तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन त्यांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतरही आवश्यक खबरदारी घेण्यात आली नसल्यामुळे आता पुन्हा एका युवा शेतकऱ्याचा बळी गेल्याने महावितरणच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

दरम्यान, कॉम्रेड आप्पा पाटील यांनी या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त करत दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. “वारंवार होणाऱ्या दुर्घटना असूनही महावितरण प्रशासन जागे होत नाही. अब्दुलाटसह परिसरातील धोकादायक डीपी, तुटलेल्या व जीर्ण झालेल्या तारा तातडीने बदलल्या जात नाहीत. आणखी किती निष्पाप शेतकऱ्यांचे बळी गेल्यानंतर महावितरणला जाग येणार?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

ग्रामस्थांनीही या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला योग्य आर्थिक मदत द्यावी तसेच संपूर्ण परिसरातील धोकादायक विद्युत यंत्रणा तातडीने सुरक्षित करावी, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, या दुर्दैवी घटनेनंतर अब्दुलाटसह परिसरात महावितरणविरोधात तीव्र जनआक्रोश निर्माण झाला असून शेतकरी व ग्रामस्थांनी मोठ्या लोकआंदोलनाचा इशारा दिला आहे. आणखी एखाद्या निष्पाप शेतकऱ्याचा जीव जाण्यापूर्वी महावितरणने आपल्या कारभारात सुधारणा करून धोकादायक वीज यंत्रणेची तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!