अब्दुल लाट / प्रतिनिधी
अब्दुल लाट येथील तरुण शेतकरी सम्मेद गिरमल यांचा शेतात काम करत असताना झालेला दुर्दैवी मृत्यू हा नैसर्गिक नसून महावितरण कंपनीच्या गंभीर निष्काळजीपणा आणि बेजबाबदार कारभाराचा परिणाम असल्याचा आरोप करत दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी कॉम्रेड आप्पा पाटील यांनी केली आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून गिरमल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.आयुष्यभर कष्ट करून मुलाला मोठे करणाऱ्या आई-वडिलांवर आणि कुटुंबावर ही मोठी शोकांतिका ओढावली आहे.त्यांच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
कॉ.आप्पा पाटील पुढे म्हणाले की,विद्युत पुरवठा सुरू करण्यापूर्वी महावितरणने आर्थिंग, विद्युत सुरक्षितता आणि इतर तांत्रिक बाबींची नियमित तपासणी करणे बंधनकारक असते. मात्र संबंधित यंत्रणेने आवश्यक दक्षता न घेतल्याने एका होतकरू तरुण शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला.हा प्रकार अत्यंत गंभीर असून यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे.
अब्दुल लाट परिसरातील महावितरणच्या कर्मचाऱ्यांविरोधात वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या तक्रारींकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला.वेळेत योग्य ती दखल घेतली असती,तर आज एका तरुणाचा जीव वाचला असता,असेही त्यांनी नमूद केले.
या प्रकरणात मृत्यूची संपूर्ण जबाबदारी महावितरण कंपनीने स्वीकारून गिरमल कुटुंबाला तातडीने भरघोस आर्थिक नुकसानभरपाई द्यावी, तसेच कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याबाबतही सकारात्मक निर्णय घ्यावा,अशी मागणी करण्यात आली आहे.याशिवाय या घटनेस जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधासह संबंधित कायद्यांनुसार गुन्हे दाखल करून कठोर शिक्षा करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली.
गिरमल कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत अब्दुल लाटमधील सर्व नागरिकांनी एकजुटीने त्यांच्या पाठीशी उभे राहावे, अन्यायाविरोधात आवाज बुलंद करावा आणि दोषींना शिक्षा होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवावा असे आवाहन कॉम्रेड आप्पा पाटील यांनी केले आहे.