शिरोळ शहर पानपट्टी संघटनेच्या अध्यक्षपदी प्रकाश संकपाळ; कार्यकारिणीची बिनविरोध निवड

Spread the love
शिरोळ / प्रतिनिधी 
शिरोळ शहर पानपट्टी संघटनेच्या नव्या कार्यकारिणीची निवड नुकतीच उत्साहपूर्ण वातावरणात बिनविरोध करण्यात आली. संघटनेच्या अध्यक्षपदी प्रकाश संकपाळ यांची, तर उपाध्यक्षपदी राजेंद्र माने यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.याशिवाय सचिवपदी विकास माळी आणि खजिनदारपदी दीपक पाटील यांचीही बिनविरोध निवड झाल्याने उपस्थित सदस्यांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करून अभिनंदन केले.
यावेळी आयोजित बैठकीत संघटनेच्या एकोप्याला आणि संघटनात्मक बळकटीला प्राधान्य देत सर्व पदांची निवड एकमताने करण्यात आली.शहरातील सर्व पानपट्टी व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या कार्यकारिणीकडून पानपट्टी व्यावसायिकांच्या विविध प्रश्नांना प्राधान्याने न्याय मिळवून देणे,व्यवसायातील अडचणी सोडविणे,शासनाच्या विविध योजनांची माहिती सदस्यांपर्यंत पोहोचविणे तसेच संघटनेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर दिला जाणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश संकपाळ यांनी सर्व सदस्यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि सदस्यांना सोबत घेऊन पारदर्शक व सर्वसमावेशक पद्धतीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. उपाध्यक्ष राजेंद्र माने, सचिव विकास माळी आणि खजिनदार दीपक पाटील यांनीही संघटनेच्या प्रगतीसाठी आणि सदस्यांच्या हितासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचे आश्वासन दिले.
बैठकीच्या शेवटी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. एकोप्याचे आणि सलोख्याचे दर्शन घडविणाऱ्या या बिनविरोध निवडीमुळे शिरोळ शहर पानपट्टी संघटनेत नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी काळात संघटना अधिक प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास उपस्थित सदस्यांनी व्यक्त केला.

Leave a Comment

error: Content is protected !!