गणेशवाडी वार्ड क्र. ५ च्या मुख्य रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य, रस्ता दुरुस्त न झाल्यास ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा
गणेशवाडी / प्रतिनिधी
गणेशवाडी येथील वार्ड क्रमांक ५ मधील मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल व पाणी साचले असून शालेय विद्यार्थी,ज्येष्ठ नागरिक, महिला आणि ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेक ठिकाणी दुचाकी घसरून अपघात घडत असून लहान मुले व नागरिक पडून जखमी होण्याच्या घटनाही वाढल्या आहेत.
या रस्त्यावरून दररोज शेकडो विद्यार्थी शाळेत जातात. मात्र चिखल तुडवत शाळेत जाण्याची वेळ त्यांच्यावर आली असून पालकांनी याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. रस्त्यावरील चिखल आणि पाण्यामुळे गंभीर रुग्णांना वेळेत उपचारासाठी रुग्णवाहिका पोहोचण्यातही मोठा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ग्रामपंचायतीने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन संबंधित रस्त्याचे खडीकरण किंवा कायमस्वरूपी काँक्रिटीकरण करावे, अशी ग्रामस्थांची एकमुखी मागणी आहे. केवळ आश्वासनांवर वेळ मारून नेण्याऐवजी त्वरित प्रत्यक्ष काम सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, येत्या काही दिवसांत या रस्त्याची डागडुजी अथवा काँक्रिटीकरण करून तो वाहतुकीस योग्य करण्यात आले नाही, तर आगामी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा संतप्त इशारा सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील, बिरा गावडे, संभाजी चौगुले, समीर जमादार, मुताप्पा पकाली, यासिन जमादार आणि उत्तम कोळेकर यांनी दिला आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन नागरिकांची गैरसोय दूर करावी, अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा निर्धारही ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.