‘श्री दत्त पॅटर्न’ देशासाठी आदर्श; शाश्वत शेतीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज – कुलगुरू डॉ. विलास खर्चे

Spread the love

“जमीन वाचली तरच शेती वाचेल”! ‘श्री दत्त पॅटर्न’ देशासाठी आदर्श; शाश्वत शेतीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज – कुलगुरू डॉ. विलास खर्चे

शिरोळ / प्रतिनिधी

देशात शेतीपुढे उभ्या ठाकलेल्या विविध आव्हानांमध्ये जमिनीचे आरोग्य जपणे, क्षारपड जमिनींचे पुनर्वसन, पाण्याचे योग्य व्यवस्थापन आणि शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब ही काळाची गरज बनली आहे. मर्यादित होत चाललेल्या शेतीक्षेत्राचे संवर्धन करताना आधुनिक विज्ञान, संशोधन आणि शेतकऱ्यांचा अनुभव यांची प्रभावी सांगड घालणे अत्यंत आवश्यक आहे. या दिशेने श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने उभारलेला ‘श्री दत्त पॅटर्न’ हा राज्यासह देशासाठी अनुकरणीय ठरत असून, जमीन आणि शेती शाश्वत करण्यासाठी सर्व संस्थांनी एकत्रित प्रयत्न केल्यास निश्चित यश मिळेल, असा ठाम विश्वास महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी व्यक्त केला.

श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजित शेतकरी मेळावा, क्षारपड जमीन सुधारणा यशोगाथा सादरीकरण आणि गळीत हंगाम २०२५-२६ मधील ऊस पीक स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

कार्यक्रमाला राष्ट्रीय भूमी लवणता अनुसंधान संस्था, कर्नाल (हरियाणा), व्ही.एस.आय. पुणे, कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज तसेच विविध कृषी तज्ज्ञ, संशोधक, शेतकरी आणि कारखान्याचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जमिनीचे संवर्धन ही काळाची गरज

डॉ. खर्चे म्हणाले की, शेतीचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध जमिनीची सुपीकता टिकविणे आणि तिचे वैज्ञानिक व्यवस्थापन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. मातीचे आरोग्य बिघडल्यास शेतीचे उत्पादन घटते, खर्च वाढतो आणि शेती तोट्यात जाते. त्यामुळे शाश्वत शेतीसाठी सर्वप्रथम जमिनीचे संरक्षण करणे आवश्यक आहे. त्यांनी सांगितले की, श्री दत्त कारखान्याने राबविलेले ‘खेत बचाव अभियान’ आणि क्षारपड जमिनी सुधारण्याची कार्यपद्धती हे संपूर्ण देशासाठी रोल मॉडेल ठरू शकते. संशोधन संस्था, विद्यापीठे आणि सहकारी संस्था यांच्यातील समन्वयातून शेतकऱ्यांना थेट फायदा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘श्री दत्त पॅटर्न’ची देशपातळीवर दखल

शेतकऱ्यांच्या सहभागातून, शास्त्रीय तंत्रज्ञानाचा वापर करून आणि संघटित प्रयत्नांच्या माध्यमातून क्षारपड जमिनी पुन्हा उत्पादनक्षम बनविण्याचे काम श्री दत्त कारखान्याने यशस्वीपणे केले आहे. या उपक्रमामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीला नवसंजीवनी मिळाली असून, जमिनीचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे हा प्रयोग केवळ एका कारखान्यापुरता मर्यादित न राहता देशभरात राबविण्याची गरज असल्याचे मतही उपस्थित तज्ज्ञांनी व्यक्त केले.

पाण्याचा वापर गरजेनुसारच व्हावा

राष्ट्रीय भूमी लवणता अनुसंधान संस्था, कर्नाल (हरियाणा) येथील सिंचन व जलनिस्सारण अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. डी. एस. बुंदेला यांनी ‘कृत्रिम निचरा प्रणाली तंत्रज्ञान आणि मार्गदर्शन’ या विषयावर मार्गदर्शन केले.ते म्हणाले की, पाण्याचा अतिरेकी वापर, योग्य निचऱ्याचा अभाव आणि नियोजनशून्य सिंचन यामुळे मोठ्या प्रमाणात जमिनी क्षारपड होत आहेत. ही समस्या टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसारच पाणी वापरावे. आधुनिक निचरा प्रणालीचा अवलंब केल्यास जमिनीतील अतिरिक्त पाणी बाहेर पडते आणि जमिनीची सुपीकता टिकून राहते.त्यांनी शेतकरी बहुउद्देशीय संस्थांमार्फत जनजागृती, प्रशिक्षण, प्रात्यक्षिके आणि सामूहिक उपक्रम राबविण्याची आवश्यकता स्पष्ट केली. योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने क्षारपड जमिनी पुन्हा उत्पादनक्षम करता येतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जमिनीचे आरोग्य टिकविणे हीच खरी गुंतवणूक

व्ही.एस.आय. पुणे येथील पीक उत्पादन व संरक्षण विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. ए. डी. कडलग यांनी ‘जमिनीच्या आरोग्याचे महत्त्व व उपाययोजना’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.ते म्हणाले की, शाश्वत शेतीचा पाया म्हणजे जमिनीचे आरोग्य. जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म संतुलित राहिले तरच उत्पादनात सातत्य राहते. मातीतील सेंद्रिय कर्ब वाढविणे, नियमित माती परीक्षण करणे, संतुलित खत व्यवस्थापन, पाण्याचे योग्य नियोजन, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर आणि कीटकनाशकांचा शास्त्रीय वापर ही काळाची गरज आहे. ऊस लागवड, खत व्यवस्थापन, तोडणीचे नियोजन आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर केल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

राहुरीचे तंत्रज्ञान आणि श्री दत्तचा अनुभव – यशस्वी संगम

कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रजचे प्रभारी अधिकारी डॉ. श्रीमंत राठोड यांनी ‘क्षारपड जमीन सुधारणा – दत्त पॅटर्नची कार्यपद्धती’ या विषयावर माहिती दिली.राहुरी कृषी विद्यापीठाचे संशोधन, शास्त्रीय तंत्रज्ञान आणि श्री दत्त कारखान्याचा प्रत्यक्ष अनुभव यांच्या एकत्रित प्रयत्नांतून हजारो एकर क्षारपड जमीन पुन्हा शेतीयोग्य झाली असल्याचे त्यांनी सांगितले.शेतकरी सहकारी संस्था स्थापन करणे, शासकीय अर्थसाहाय्य उपलब्ध करून देणे, बंदिस्त सच्छिद्र निचरा प्रणालीचा वापर आणि तांत्रिक मार्गदर्शन या चार घटकांवर हा प्रकल्प यशस्वी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.भविष्यातही ‘शिरोळ दत्त मॉडेल’ अधिक व्यापक स्वरूपात राबवून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी सर्व संस्थांनी एकत्र काम करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

शेतकऱ्यांच्या अनुभवांनी प्रेरणा

कार्यक्रमात सतपाल खोंद्रे, जंबूकुमार चौगुले, रावसो विठ्ठाण्णा आणि सौ. अश्विनी शेरीकर या शेतकऱ्यांनी आपले अनुभव मांडले.क्षारपड जमिनी सुधारल्यानंतर उत्पादनात झालेली वाढ, पाण्याची बचत, खर्चात झालेली कपात आणि आर्थिक परिस्थितीत झालेला सकारात्मक बदल याविषयी त्यांनी अनुभव कथन केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यास शेती अधिक फायदेशीर होऊ शकते, असा संदेश त्यांनी दिला.शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ऊस पीक स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

[ अडसाली ऊस पीक स्पर्धा ]

प्रथम – आण्णासो हंबीरराव पाटील (माले)

द्वितीय – जंबूकुमार बापूसो चौगुले (साजणी)

तृतीय – सुभाष रामगोंडा पाटील (शिरगुपी)

[ उत्तेजनार्थ पुरस्कार ]

भाऊसो ईश्वरा पसारे (कारदगा)

लक्ष्मण ईश्वरा पसारे (कारदगा)

महादेव भाऊ कुलकर्णी (कुन्नूर)

[ पूर्वहंगामी ऊस पीक स्पर्धा ]

दादासो जिन्नाप्पा गतारे (शिरटी)

[ खोडवा ऊस पीक स्पर्धा ]

श्रीपाद तातोबा शेरीकर (माणगाव)

शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ऊस पीक स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.यावेळी वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार प्राप्त प्रवीण माळी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, संचालक मंडळाचे सदस्य, कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रजचे प्रभारी अधिकारी डॉ. अनिल राजगुरू, डॉ. सचिन महाजन, डॉ. संग्राम काळे, महाधन ॲग्रोटेकचे विभागीय विपणन व्यवस्थापक योगेश म्हसे, एस. व्ही. ॲग्रो सोल्युशन पुणेचे संचालक डॉ. शांतीकुमार पाटील, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा, ऊस विकास अधिकारी ए. एस. पाटील, ऊस पुरवठा अधिकारी पी. एस. देसाई, हलसिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक रामगोंडा पाटील (जनवाड), कृषीपंडित सुरेश देसाई (बेडकिहाळ) तसेच महाराष्ट्र व कर्नाटकातील शेकडो सभासद शेतकरी, कृषी अधिकारी आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वर्गीय डॉ. सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख व उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर कलगी यांनी केले, तर आभार कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी मानले.

शाश्वत शेतीकडे वाटचाल

हा शेतकरी मेळावा केवळ बक्षीस वितरणापुरता मर्यादित न राहता शाश्वत शेतीचा संदेश देणारा ज्ञानोत्सव ठरला. जमिनीचे संवर्धन, पाण्याचे योग्य व्यवस्थापन, मातीचे आरोग्य, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि संशोधन संस्थांशी थेट समन्वय या पाच सूत्रांवर आधारित ‘श्री दत्त पॅटर्न’ भविष्यातील शेतीसाठी आशेचा किरण ठरत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. शेतकरी, संशोधक आणि सहकारी संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून शेती अधिक समृद्ध, उत्पादनक्षम आणि पर्यावरणपूरक होऊ शकते, असा विश्वास या मेळाव्यातून पुन्हा एकदा दृढ झाला.

Leave a Comment

error: Content is protected !!