गृहपाल ते राजपत्रित गट-अ अधिकारी; उदय महाजन यांची वरिष्ठ संशोधन अधिकारीपदी दमदार झेप

Spread the love

पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे 

जिद्द, सातत्य आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा बावडा येथील उदय श्रीरंग महाजन यांनी घालून दिले आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, धुळे येथे वरिष्ठ संशोधन अधिकारी (राजपत्रित, गट-अ) या पदावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) भरती प्रक्रियेतून त्यांची निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

उदय महाजन यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कोल्हापूर येथील विद्यापीठ हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी विवेकानंद महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. पुढे छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च (सीएसआयबीईआर), कोल्हापूर येथून पदव्युत्तर शिक्षण घेतले. शिक्षणासोबतच त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सातत्याने सुरू ठेवत आपल्या ध्येयाकडे वाटचाल केली.

महाजन यांनी आदिवासी विकास विभागात गृहपाल म्हणून तब्बल १३ वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावली. शासकीय जबाबदाऱ्या सांभाळत असतानाच त्यांनी अभ्यासातील सातत्य कायम ठेवले. अथक मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण करत राजपत्रित गट-अ अधिकाऱ्याच्या पदापर्यंत मजल मारली. त्यामुळे त्यांचा संघर्षमय आणि यशस्वी प्रवास अनेक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

गृहपाल पदापासून वरिष्ठ संशोधन अधिकारी या महत्त्वाच्या पदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा केवळ वैयक्तिक यश नसून, प्रामाणिकपणा, सेवाभाव, शिस्त आणि अविरत प्रयत्न यांच्या बळावर यश संपादन करता येते, याचा आदर्श ठरला आहे. सरकारी सेवेत कार्यरत राहूनही मोठे ध्येय गाठण्याची त्यांची जिद्द अनेकांना नवी दिशा देणारी आहे.

उदय महाजन यांचे वडील महाराष्ट्र पोलिस दलात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक म्हणून सेवेतून निवृत्त झाले आहेत. कुटुंबातून मिळालेली शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणाचे संस्कार हेच त्यांच्या यशामागील मोठे बळ असल्याची भावना त्यांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केली.

महाजन यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल प्रशासकीय अधिकारी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, मित्रपरिवार तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या पुढील शासकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या यशामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नव्या उत्साहाचे आणि आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. उदय महाजन यांची ही यशोगाथा नक्कीच अनेक तरुणांसाठी प्रेरणेचा दीप ठरणारी आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!