शिरोळ पालिकेच्या आढावा बैठकीत विभागनिहाय नियोजनाचा सविस्तर आढावा; भाविकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करण्यावर भर
शिरोळ / प्रतिनिधी
श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे प्रत्येक बारा वर्षांनी भरविण्यात येणाऱ्या कन्यागत महापर्वाला धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. या महापर्वाच्या निमित्ताने राज्यासह देशाच्या विविध भागांतून लाखो भाविक दर्शनासाठी येणार असल्याने त्यांच्या सुरक्षित,सुकर आणि सुखकर दर्शन व्यवस्थेसाठी आवश्यक असलेले सर्व विभागीय प्रस्ताव १५ ऑगस्टपूर्वी शासनाकडे सादर करावेत, अशा स्पष्ट सूचना शिरोळचे उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी दिल्या.
शिरोळ नगरपालिकेच्या वतीने येथील टारे क्लब हाऊस येथे कन्यागत महापर्व २०२७-२८ च्या पूर्वतयारीसंदर्भात सर्व शासकीय विभागांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. शिरोळच्या प्रथम लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा सौ. योगिता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध विभागांकडून करण्यात येणाऱ्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीत महापर्व काळात भाविकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपाययोजनांवर सकारात्मक आणि विधायक चर्चा झाली.
यावेळी मार्गदर्शन करताना उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव म्हणाले की, प्रयागराज कुंभमेळ्याप्रमाणेच श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे होणाऱ्या कन्यागत महापर्वाला मोठे धार्मिक महत्त्व आहे. या महोत्सवासाठी शासनाच्या विविध विभागांनी आतापासूनच नियोजनबद्ध तयारी करणे आवश्यक आहे. प्रत्येक विभागाने आपल्या कार्यक्षेत्रातील आवश्यक कामांचे प्रस्ताव वेळेत तयार करून शासनाकडे पाठविल्यास निधी उपलब्ध होऊन कामांना गती मिळेल. त्यामुळे भाविकांना अधिक चांगल्या सुविधा देता येतील.
महापर्व काळात वाहतुकीवर मोठा ताण येणार असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती, रुंदीकरण तसेच आवश्यक तेथे नवीन रस्त्यांची उभारणी करण्याकडे विशेष लक्ष द्यावे, अशी सूचना त्यांनी केली. नगररचना विभागाने पर्यायी मार्गांचे नियोजन करून भविष्यातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नवीन रस्त्यांचे प्रस्ताव सादर करावेत, असेही त्यांनी सांगितले.
पाणीपुरवठा विभागाने महापर्वाच्या काळात लाखो भाविकांना शुद्ध, स्वच्छ आणि मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक नियोजन करावे. पंचगंगा, कृष्णा आणि वारणा नदी परिसरात स्वच्छता राखत प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविणे अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पाटबंधारे विभागाने कृष्णा व पंचगंगा नदीकाठावर सुरक्षित आणि सुस्थितीत घाटांची उभारणी करावी. तसेच शिरोळ बंधाऱ्यावर नवीन पूल उभारून त्याला जोडणाऱ्या रस्त्यांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, अशी मागणीही त्यांनी केली. नदीप्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याबाबतही शासन स्तरावर प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले.
राज्य परिवहन विभागाने भाविकांची संभाव्य संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त एसटी बस आणि ई-बस सेवा उपलब्ध कराव्यात. महत्त्वाच्या ठिकाणी बसथांबे, पिकअप शेड आणि प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा निर्माण कराव्यात, असेही यादव यांनी स्पष्ट केले.
महावितरण कंपनीने प्रमुख मार्गांवर हायमास्ट दिव्यांची उभारणी करून रात्रीच्या वेळी प्रकाशव्यवस्था सक्षम करावी. भविष्यातील गरज लक्षात घेऊन शक्य त्या ठिकाणी भूमिगत वीजवाहिन्यांचे नियोजन करण्याचाही त्यांनी आग्रह धरला.
आरोग्य विभागाने महापर्व काळात रुग्णवाहिका, वैद्यकीय पथके, फिरते दवाखाने, आवश्यक औषधसाठा आणि आपत्कालीन आरोग्य सुविधा उपलब्ध ठेवाव्यात. खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या ठिकाणांची नियमित तपासणी करून नागरिकांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
पोलीस प्रशासनाने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रभावी नियोजन करावे. गर्दीच्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवून भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी सूचना त्यांनी केली. तहसील प्रशासनाने कन्यागत महापर्वाची व्यापक प्रसिद्धी करून आवश्यक समन्वय साधत सर्व विभागांशी सातत्याने संपर्क ठेवावा, असेही त्यांनी नमूद केले.
बैठकीत सर्वेश कुलकर्णी यांनी शिरोळ येथील श्री दत्त भोजनपात्र मंदिराच्या धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वाची माहिती दिली. नगरसेवक सचिन शिंदे, श्री नृसिंहवाडी दत्त देवस्थानचे अध्यक्ष गुंडो पुजारी, अविनाश (पांडुरंग) माने, बाळासाहेब माळी, सर्वेश कुलकर्णी, आनंदराव माने-देशमुख यांच्यासह उपस्थितांनी विविध विधायक सूचना मांडल्या.कन्यागत महापर्व अधिक सुयोग्य आणि संस्मरणीय करण्यासाठी सर्व स्तरावर समन्वय ठेवून नियोजन करण्याची आवश्यकता यावेळी व्यक्त करण्यात आली.
बैठकीस मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, नगरसेविका सौ. सुवर्णा कांबळे, सविता पुजारी, कल्पना काळे, अनुराधा गुरव, अनिता संकपाळ, शोभा कोरे, दिपाली फल्ले, श्वेता जाधव तसेच नगरसेवक विजय आरगे, शरद (बापू) मोरे, उल्हास आवळे, दिपक भाट, ओंकार गावडे, निलेश गावडे, मानसिंगराव पाटील, अनिकेत जोशी, रावसाहेब माने, बबन पुजारी, नेताजी जाधव, धनाजी पाटील-नरदेकर, श्री दत्त देवस्थानचे रामचंद्र पुजारी, प्रतिकसिंह जगदाळे, शिवाजीराव चव्हाण, बाळासो कोळी-दिवाण, पंडित काळे, बापूसो गंगधर, संतोष जाधव, राजेंद्र कांबळे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार नगरसेवक सचिन शिंदे यांनी मानले.
चौकट
काही विभागांचे अधिकारी अनुपस्थित
कन्यागत महापर्वाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीस काही विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहू शकले नाहीत. तहसीलदार अनिलकुमार हेळकर, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग (जयसिंगपूर व कोल्हापूर) आणि नगररचना विभागाचे अधिकारी अनुपस्थित असल्याची नोंद घेण्यात आली. तथापि, उपस्थित लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी महापर्वाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभागांनी अधिक समन्वयाने कार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली.