तांदुळवाडीसारख्या दुर्घटनेनंतरच सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार का?; ‘एस कॉर्नर’जवळील उघडी विहीर ठरतेय मृत्यूचा सापळा!

Spread the love

तांदुळवाडीसारख्या दुर्घटनेनंतरच सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार का?; सुरक्षा कठडे उभारण्याची नागरिकांची आक्रमक मागणी

माणकापूर / दिलीप शिरढोणे 

माणकापूर – रांगोळी मार्गावरील ‘एस कॉर्नर’जवळ रस्त्यालगत असलेली उघडी विहीर सध्या वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा बनली आहे.माणकापूर फाट्यापासून अवघ्या ५० फुटांवर आणि रस्त्यापासून केवळ ३ ते ४ फुटांच्या अंतरावर असलेल्या या खोल विहिरीभोवती कोणतेही सुरक्षा कठडे,संरक्षक भिंत किंवा इशारा देणारी व्यवस्था नसल्याने मोठ्या अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या गंभीर दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, तांदुळवाडीसारखी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल परिसरातून उपस्थित केला जात आहे.या मार्गावरून दररोज शेकडो दुचाकी,चारचाकी तसेच अवजड वाहने मोठ्या वेगाने धावत असतात.रस्ता चांगल्या स्थितीत असल्याने वाहनांचा वेगही अधिक असतो.मात्र ‘एस कॉर्नर’सारख्या वळणावर रस्त्याच्या अगदी कडेला असलेली ही उघडी विहीर वाहनचालकांसाठी गंभीर संकट ठरत आहे. विशेषतः रात्रीच्या अंधारात,पावसाळ्यात किंवा समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रकाशामुळे अंदाज चुकल्यास वाहन थेट विहिरीत कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.काही दिवसांपूर्वी पंढरपूर येथे रस्त्याशेजारील विहिरीत वाहन कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेची आठवण अद्याप ताजी असताना, माणकापूर – रांगोळी मार्गावरील ही धोकादायक परिस्थिती प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे जिवंत उदाहरण ठरत आहे. जीवितहानी होण्यापूर्वी उपाययोजना करण्याऐवजी दुर्घटना घडल्यानंतरच यंत्रणा हलते, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनधारक व्यक्त करत आहेत.प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अखेर एका जागरूक नागरिकाने पुढाकार घेत मंगळवारी सकाळी रस्त्याच्या कडेला छोटे दगड ठेवून वाहनचालकांना धोका असल्याचा इशारा देण्याचा प्रयत्न केला.मात्र ही व्यवस्था तात्पुरती असून, संबंधित विभागाची जबाबदारी नागरिकांवर ढकलण्याचा प्रकार असल्याची टीका होत आहे.परिसरातील ग्रामस्थांनी या विहिरीभोवती तात्काळ मजबूत लोखंडी सुरक्षा कठडे अथवा सिमेंटची संरक्षक भिंत उभारण्याची मागणी केली आहे. तसेच ‘एस कॉर्नर’ आणि विहिरीचा धोका दर्शविणारे दिशादर्शक फलक, रात्री स्पष्ट दिसतील असे रिफ्लेक्टर आणि इशारा फलक त्वरित बसविण्याचीही मागणी करण्यात आली आहे.याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कारवाई करून संभाव्य दुर्घटना टाळावी, अन्यथा मोठा अपघात झाल्यास त्याची संपूर्ण नैतिक व प्रशासकीय जबाबदारी संबंधित विभागावर राहील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!