शिरोळ पालिकेकडून ‘श्री बुवाफन नगर’ नामकरणास मंजुरी; नागरिकांच्या मागणीला अखेर यश

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळ शहरातील अर्जुनवाड रस्त्यालगत असलेल्या नागरी वस्तीला ‘श्री बुवाफन नगर’ असे नामकरण करण्यास शिरोळ नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागणीला अखेर न्याय मिळाला असून, सोमवारी नगरपालिकेच्या मंजुरीच्या ठरावाची प्रत नागरिकांच्या स्वाधीन करण्यात आली.

या नामकरणासाठी नगरपालिकेच्या बांधकाम सभापती सौ अनिता संकपाळ आणि नगरसेवक उल्हास आवळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.स्थानिक नागरिकांनी अर्जुनवाड रस्त्यालगतच्या वस्तीला ‘श्री बुवाफन नगर’ असे अधिकृत नामकरण करण्याची लेखी मागणी नगरपालिकेकडे केली होती.या मागणीचा विचार करत नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आला.

प्रथम लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा सौ. योगिता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. सभेत या विषयावर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर ‘श्री बुवाफन नगर’ या नावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. नगरपालिकेने अधिकृत ठराव मंजूर केल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. नगरपालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी मंजुरीच्या ठरावाची प्रत परिसरातील रहिवाशांकडे सुपूर्द केली. यावेळी उपस्थित नागरिकांनी नगरपालिकेचे पदाधिकारी आणि प्रशासनाचे आभार व्यक्त करत या निर्णयाचे स्वागत केले. अनेक वर्षांपासून या नागरी वस्तीला अधिकृत नाव मिळावे, अशी स्थानिकांची अपेक्षा होती. अखेर ती पूर्ण झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

या प्रसंगी माजी सरपंच गजानन संकपाळ, उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव, प्रतिष्ठित नागरिक श्रीकांत माने गावडे, पै. नंदू सुतार, माजी नगरसेवक रावसाहेब पाटील मलिकवाडे, राजेंद्र माने यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी ‘श्री बुवाफन नगर’ या नामकरणामुळे परिसराची स्वतंत्र ओळख निर्माण होणार असून, भविष्यात शासकीय नोंदी, टपाल व्यवस्था तसेच विविध विकासकामांमध्येही या नावाचा उपयोग होणार असल्याचे मत व्यक्त केले.नगरपालिकेने नागरिकांच्या भावनांचा आदर करत घेतलेल्या या निर्णयामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.विकासकामांसोबतच सांस्कृतिक आणि सामाजिक अस्मिता जपणारे निर्णयही नगरपालिकेने घ्यावेत,अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. ‘श्री बुवाफन नगर’ या नामकरणामुळे परिसराला नवी ओळख मिळणार असून, हा निर्णय शिरोळ शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!