राष्ट्रीय पोलिओ दिनानिमित्त पुलाची शिरोलीत पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

Spread the love

 पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे

“दोन थेंब जीवनाचे, उज्ज्वल भविष्याचे” या घोषवाक्याखाली राष्ट्रीय पोलिओ दिनानिमित्त पुलाची शिरोली येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ उत्साहात झाला. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह व विठ्ठल मंदिर परिसरात आयोजित कार्यक्रमात लोकनियुक्त महिला सरपंच सौ. पद्मजा कृष्णात करपे व तालुका पंचायत सदस्या सौ. कमल प्रकाश कौंदाडे यांच्या हस्ते पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून मोहिमेची सुरुवात करण्यात आली.

यावेळी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत बालकांचे लसीकरण करण्यात आले. कार्यक्रमातून प्रत्येक पालकाने आपल्या पाच वर्षांखालील बालकाला पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजावेत, असे आवाहन करण्यात आले.

मान्यवरांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, पोलिओमुक्त भारताचे यश कायम राखण्यासाठी प्रत्येक बालकापर्यंत लसीकरण पोहोचणे अत्यावश्यक आहे. पोलिओविरुद्धची लढाई ही केवळ शासनाची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक नागरिकाने त्यात सक्रिय सहभाग घेणे गरजेचे आहे. नियमित लसीकरण, जनजागृती आणि आरोग्य यंत्रणेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच देशाला पोलिओमुक्त दर्जा कायम ठेवणे शक्य झाले आहे. त्यामुळे एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य मा. सलीम महात, पंचायत समिती सदस्य मा. अरुण, मा. कृष्णात करपे, मा. संदीप तानवडे, मा. सुरेश खोत, मा. बाळासो वनागडे, मा. विजय सूर्यवंशी यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका तसेच पुलाची शिरोलीतील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेच्या माध्यमातून गावातील प्रत्येक पाच वर्षांखालील बालकापर्यंत पोलिओ प्रतिबंधक लस पोहोचविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Comment

error: Content is protected !!