शिरोळ / प्रतिनिधी
राज्यभर मान्सूनचे आगमन लांबल्याने अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण होत असून धरणांमधील पाणीसाठाही चिंताजनकरीत्या घटला आहे.या पार्श्वभूमीवर शिरोळ शहरातील नागरिकांना भविष्यात पाण्याअभावी त्रास सहन करावा लागू नये, यासाठी प्रभाग क्रमांक ७ चे शालेय शिक्षण व क्रीडा समिती सभापती शरद उर्फ बापू मोरे यांनी पुढाकार घेत कोरवी गल्ली व वडर गल्ली येथे नवीन बोरवेलची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.प्रभागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे परिसरातील अनेक कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.उन्हाळ्यात तसेच पावसाळ्याच्या अनिश्चित परिस्थितीत पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन बापू मोरे यांनी तातडीने हा निर्णय घेतल्याचे नागरिकांनी सांगितले.या बोरवेलचा शुभारंभ पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रताप उर्फ बाबा पाटील यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष योगिता कांबळे,उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव, नगरसेविका अनुराधा गुरव,शरद उर्फ बापू मोरे, रुपेश मोरे,शक्तीजीत गुरव यांच्यासह परिसरातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी पाणी ही जीवनावश्यक गरज असल्याचे सांगत उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करण्याचे आवाहन केले.तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी तत्परतेने काम करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.प्रभाग क्रमांक ७ मधील नागरिकांच्या अडचणी जाणून घेत त्यावर त्वरित उपाययोजना करण्याची भूमिका बापू मोरे यांनी सातत्याने घेतली आहे.पाणीटंचाईसारख्या गंभीर प्रश्नावर वेळेत केलेल्या या कामामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या या लोकाभिमुख उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.आगामी काळातही प्रभागातील विकासकामे आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देत विविध लोकहिताचे उपक्रम राबविण्यात येतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.