इचलकरंजीच्या पाण्यासाठी शिरोळ तालुक्याचा बळी का?, प्रदूषण इचलकरंजीचे, त्याग मात्र शिरोळचा; अन्याय खपवून घेतला जाणार नाही दीपक पाटील

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

इचलकरंजी शहराच्या नव्या पाणीपुरवठा योजनेसाठी शिरोळ तालुक्यातील विविध ठिकाणांहून पाणी उपसा करण्याच्या हालचालींवर आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत शिरोळ तालुक्यातून तीन ठिकाणांहून पाणी उचलण्याबाबत चाचपणी झाल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांनी शासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.दीपक पाटील म्हणाले, कुरुंदवाड परिसरातून शिरोळ तालुक्याने यापूर्वीच आपल्या हक्काचे पाणी इचलकरंजी शहरासाठी दिले आहे. मग प्रत्येक वेळी त्याग फक्त शिरोळ तालुक्यानेच का करायचा? इचलकरंजीतील सांडपाणी आणि प्रक्रिया उद्योगांमधून सोडले जाणारे रासायनिक प्रदूषण यामुळे पंचगंगा नदीची अवस्था गटारगंगेसारखी झाली आहे.या प्रदूषणाचे दुष्परिणाम शिरोळ तालुक्यातील नागरिक आणि शेतकरी वर्षानुवर्षे सहन करत आहेत.इचलकरंजी लगतची पंचगंगा नदी प्रदूषित करून स्वच्छ पाण्यासाठी पुन्हा शिरोळ तालुक्याकडे पाहणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शासनाने नवीन पाणीपुरवठा योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्याऐवजी पंचगंगा नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नदीचे पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही त्यांनी केली.शिरोळ तालुक्यातील जनतेच्या जीवावर उठण्याचे धोरण तातडीने थांबवावे.स्थानिकांच्या हक्काच्या पाण्यावर गदा आणणारा कोणताही निर्णय सहन केला जाणार नाही.गरज पडल्यास तीव्र लोकआंदोलन उभारले जाईल,असा इशाराही दीपक पाटील यांनी मुख्यमंत्री तसेच बैठकीला उपस्थित लोकप्रतिनिधींना दिला.या भूमिकेमुळे इचलकरंजीच्या पाणीप्रश्नावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!