शिरोळच्या राजाराम विद्यालयात सेमी इंग्रजी शिक्षण सुरु विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेस सर्वतोपरी सहकार्य : डॉ अंगराज माने 

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

येथील राजाराम विद्यालयात नेहमीच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात आहे. शाळेच्या भौतिक सुविधा पूर्ततेसाठी शालेय व्यवस्थापन समिती आणि शिक्षक सातत्याने प्रयत्नशील आहेत.यावर्षी शाळेत सेमी इंग्रजी शिक्षणास सुरुवात करून विद्यार्थ्यांचे हीत जपण्याचा प्रयत्न केला आहे. या शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आपले सर्वतोपरी सहकार्य राहील अशी ग्वाही रोटरी क्लब ऑफ शिरोळचे अध्यक्ष डॉ. अंगराज माने यांनी दिली.येथील राजाराम विद्यालयात शाळेच्या पहिला शैक्षणिक दिवसानिमित्त आयोजित केलेल्या प्रवेशोत्सव सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अंगराज माने हे बोलत होते. शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य व पत्रकार चंद्रकांत भाट या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.प्रारंभी पालकांच्या असते प्रतिमा पूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक सनी सुतार यांनी स्वागत करून आपल्या प्रास्ताविकात शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक, गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. पहिलीच्या विद्यार्थ्यांना लागणाऱ्या सेमी इंग्रजी पुस्तकाचा संच रोटरी क्लब ऑफ शिरोळने उपलब्ध करून दिला. शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य सचिन सावंत यांनी आवश्यक शैक्षणिक साहित्य दिले. मान्यवरांच्या हस्ते त्याचे वितरण करण्यात आले. समारंभाचे अध्यक्ष चंद्रकांत भाट यांनी शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता वाढविण्यासाठी अभिनव प्रयोग सातत्याने करत आहेत. शाळेच्या भौतिक सुविधाकरिता शासनाचा निधी उपलब्ध करणे तसेच लोकसहभागातून प्रयत्न केले जात आहेत. विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे सर्व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे. असे सांगून त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळते त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांचा राजाराम शाळेत प्रवेश घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष सर्जेराव कांबळे, राजाराम विद्यालय माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष सचिन देशमुख, पालक गजानन पाटील यांनी मनोगत व्यक्त करून शाळेच्या प्रगतीचे कौतुक केले.यावेळी रोटरी क्लबचे सदस्य युवराज जाधव, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारुती जाधव, सदस्य पत्रकार बाळासाहेब कांबळे, नामदेव गंगधर, शिक्षक सुनील घुमान्ना, रवींद्र वाघ, प्रतिभा साळोखे, अश्विनी पाटील, यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!