एमआयडीसीतील कंपन्यांवर डल्ला टाकणाऱ्या चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; दोन जेरबंद, २५.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई; तीन चोरीचे गुन्हे उघड, साथीदारांचा शोध सुरू

पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे 

पुलाची शिरोली एमआयडीसी परिसरातील औद्योगिक कंपन्यांना लक्ष्य करून लाखो रुपयांचे कार्बाईड इन्सर्ट, ड्रिल्स आणि अन्य मौल्यवान साहित्य चोरणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल २५ लाख ३६ हजार ७२३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शिरोली एमआयडीसी व गांधीनगर पोलीस ठाण्यांतील एकूण तीन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.५ ते ६ जून २०२६ दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शिरोली येथील स्काय टेक्नोव्हिजन व एस. व्ही. इंजिनीअरिंग सोल्युशन या कंपनीचे शटर फोडून आत प्रवेश केला. त्यांनी लोखंडी कपाटातील कार्बाईड इन्सर्ट, टूल्स, डीव्हीआर आणि वाय-फाय उपकरणे लंपास केली. या घटनेनंतर शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली. पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली.तपासादरम्यान चोरीतील मुद्देमाल विक्रीसाठी आरोपी किणी परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी १६ जून रोजी सापळा रचला. महिंद्रा जीतो स्ट्राँग मालवाहू वाहनासह विजय विलास गोसावी (वय २९) आणि राहुल शिवाजी गोसावी (वय ३४) या दोघांना ताब्यात घेण्यात आले.झडतीमध्ये विविध कंपन्यांचे हजारो कार्बाईड इन्सर्ट, ड्रिल्स, एंडमिल, मोबाईल हँडसेट आणि चोरीसाठी वापरण्यात आलेले वाहन जप्त करण्यात आले. आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत २५.३६ लाख रुपयांहून अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले.चौकशीत आरोपींनी इतर साथीदारांच्या मदतीने शिरोली एमआयडीसी आणि गांधीनगर परिसरात चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्या कबुलीजबाबावरून शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यातील दोन आणि गांधीनगर पोलीस ठाण्यातील एक अशा एकूण तीन चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. फरार साथीदारांचा शोध सुरू असून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक श्री. आण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच त्यांच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तरीत्या यशस्वीपणे पार पाडली.

Leave a Comment

error: Content is protected !!