शिरोळ / प्रतिनिधी
नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ आणि प्रभावीपणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शिरोळ नगरपरिषद आणि ग्रामीण रुग्णालय,शिरोळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या विशेष विवाह नोंदणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.शासनाच्या नियमानुसार विवाह नोंदणीचे महत्त्व लक्षात घेऊन आयोजित या उपक्रमामुळे अनेक नागरिकांना जागेवरच मार्गदर्शन व सुविधा मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.या विशेष शिबिरामध्ये एकूण २७ नागरिकांनी विवाह नोंदणी प्रक्रियेची सविस्तर माहिती घेतली.तसेच सात नव्या विवाह नोंदणी अर्जांचा स्वीकार करण्यात आला.विशेष म्हणजे,प्रायोगिक तत्त्वावर दोन पात्र जोडप्यांना नगराध्यक्षा सौ. योगिता कांबळे यांच्या हस्ते तत्काळ विवाह प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे नागरिकांचा वेळ वाचण्यास मदत झाली असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.शिबिरादरम्यान आलेल्या नागरिकांच्या आवश्यक कागदपत्रांची कायदेशीर तपासणी करून अर्ज स्वीकारण्यात आले.तसेच विवाह नोंदणीसंदर्भातील सर्व प्रक्रिया,आवश्यक कागदपत्रे आणि पुढील कार्यवाहीबाबत प्रशासनाच्या वतीने सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.नागरिकांची सोय लक्षात घेऊन शिरोळ नगरपरिषदेने महत्त्वपूर्ण निर्णय घेत दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या गुरुवारी विवाह नोंदणीची नियमित सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे.संबंधित दिवशी शासकीय सुट्टी असल्यास लगतच्या शुक्रवारी ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना विवाह नोंदणीसाठी वारंवार कार्यालयीन फेऱ्या मारण्याची आवश्यकता राहणार नाही.विवाह नोंदणीमुळे विविध शासकीय योजना, कायदेशीर प्रक्रिया आणि लाभ मिळविणे अधिक सोयीचे होत असल्याने नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी केले.या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी नगराध्यक्षा सौ. योगिता कांबळे, उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. उषा चोले, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, सर्व नगरसेवक-नगरसेविका तसेच नगरपरिषद आणि ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. नागरिकाभिमुख प्रशासनाचा आदर्श निर्माण करणारा हा उपक्रम म्हणून या शिबिराची सर्वत्र चर्चा होत आहे.