पत्रकारितेत सत्याचे मूल्य सर्वतोपरी; ज्ञान व कौशल्याची सांगड घालण्याची गरज : प्राचार्य डॉ. विरूपाक्ष खानाज

Spread the love

इचलकरंजीच्या नाईट कॉलेजमध्ये ‘मुक्तसंवाद’ अंकाचा प्रकाशन सोहळा संपन्न!

इचलकरंजी / प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (नाशिक) अभ्यास केंद्र,नाईट कॉलेज ऑफ आर्टस अँड कॉमर्स, इचलकरंजी येथील तृतीय वर्ष जनसंज्ञापन व वृत्तपत्र विद्या विभागाच्या वतीने ‘मुक्तसंवाद’ अंकाचा प्रकाशन सोहळा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विरूपाक्ष खानाज होते.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ.विरूपाक्ष खानाज म्हणाले, “सध्या वृत्तपत्र विद्या क्षेत्रात भयंकर स्पर्धा निर्माण झाली असून,यात टिकण्यासाठी अफाट व्यासंगाची गरज आहे.पत्रकारितेत सत्याचे मूल्य सर्वतोपरी असून विद्यार्थ्यांनी ज्ञान आणि कौशल्याची सांगड घालणे आवश्यक आहे.मानवाला अन्नाबरोबरच ज्ञानाचीही तितकीच गरज असते.याप्रसंगी प्रा.एफ.एम.पटेल यांनी आपले विचार मांडताना, “पत्रकारिता ही सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी करण्याची आवश्यकता आहे,” असे प्रतिपादन केले.तर ज्येष्ठ पत्रकार व मार्गदर्शक डॉ. पी.आर. पिळणकर यांनी, “प्रिंट मीडियावरील लोकांचा विश्वास आजही कायम असून, उत्तम बातमीसाठी पत्रकाराकडे चौकस वृत्ती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे,असे सांगितले.प्रमुख पाहुणे व पत्रकार अभिजित पटवा यांनी ‘मुक्तसंवाद’ अंकाच्या दर्जेदारपणाचे कौतुक केले.ते म्हणाले, “वृत्तपत्र काढणे आणि बातमी करणे म्हणजे लष्कराच्या भाकऱ्या भाजण्यासारखेच आहे.समाजात बदल घडवण्याची आणि काहीतरी करण्याची प्रामाणिक इच्छा असणारेच या क्षेत्रात टिकून राहतात.आपले वेगळेपण जपून पत्रकारिता केल्यास तुम्ही निश्चितच यशस्वी व्हाल. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचलन प्रा.सचिन बेलेकर यांनी केले. अतिथी परिचय गणेश कोळेकर यांनी तर आभार कृष्णात इंगळे यांनी मानले.या सोहळ्याला डिजिटल मीडियाचे रणधीर नवनाळे,शिवसागर निषाद,दिलीप शिरढोणे,रमेश कोळी,रुपराज घवले,अनिल मगदूम,डॉ.दिपिका कोकरे यांच्यासह जनसंज्ञापन व वृत्तपत्र विद्या विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!