पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सांगली फाटा येथील उड्डाणपुलावर आज सायंकाळी चार वाजण्यासुमार एका अज्ञात वाहनाने मालवाहतूक करणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षा चालक गंभीर जखमी झाला असून रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक तब्बल चार तास विस्कळीत झाली होती.मिळालेल्या माहितीनुसार रिक्षा चालक गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीतून कास्टिंग घेऊन शिरोलीकडे येत असताना सायंकाळी चार वाजण्यासुमार सांगली फाटा उड्डाणपुलावर एका अज्ञात वाहनाने रिक्षाला पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत रिक्षा महामार्गावरच पलटी झाली.अपघाताची माहिती मिळताच शिरोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेवून . पोलिसांनी अपघातग्रस्त रिक्षा बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सध्या महामार्गाचे काम सुरू असल्याने आणि अपघातामुळे लागलेल्या रांगांमुळे रात्री ८ वाजेपर्यंत या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. सुमारे ४ तास वाहनधारकांना या कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला.